वाईन शॉप फोडून ‘तो’ करायचा महागड्या दारुची चोरी! पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या चोरावर एक-दोन नव्हे 21 गुन्ह्यांची आहे नोंद

By Raigad Times    12-Sep-2021
Total Views |
Crime in city_Navi Mumbai
 
3 लाखांची विदेशी दारु जप्त; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
पनवेल । चोर कधी, काय चोरी करेल, याचा नेम नाही. अशाच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाईन शॉप फोडून महागड्या दारुच्या बाटल्यांसह रोख रक्कम चोरी करणार्‍या एका चोराला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर एक, दोन नव्हे तब्बल 21 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
विशेष म्हणजे, हा चोर वाईन शॉपमधून फक्त विदेशी दारुच्या बाटल्याच चोरी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले एक वाईन शॉप 11 ऑगस्टला लुटल्याची घटना घडली होती. वॉईन शॉपचे शटर ब्रेक करुन वाईन शॉपमधील महागडी दारु चोरी केल्याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या घटनेचा तपास सुरु असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, गुन्हा करण्याची पद्धत, तसेच नवी मुंबई आयुक्तालयामध्ये अशाच प्रकारचे यापूर्वी दाखल झालेले गुन्हे याचा तांत्रिक तपास करण्यात आला. या सर्व गुन्ह्यातील मोडस ऑपरेंडी सारखीच होती. यावरुन नवी मुंबईतील हे गुन्हे एकाच व्यक्तीने केल्याचे एनआरआय पोलिसांच्या लक्षात आले.

Crime in city_Navi Mumbai
 
गेले वर्षभर नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस या सराईत चोरट्याचा शोध घेत होते. एनआरआय पोलिसांनी या चोरट्याला पकडण्यासाठी 3 टीम तयार केल्या. त्यांच्याकडून तपास सुरु असताना कल्याण येथील खडेवडवली गावात राहणार्‍या रामनिवास मंजू गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता रामनिवासने गुन्ह्याची कबुली दिली.
 
या गुन्ह्याव्यतिरिक्त रामनिवास मंजू याने नवी मुंबईत केलेल्या इतर 6 गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्याच्यावर मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात एकूण 21 गुन्हे दाखल असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, तळोजा, नेरुळ आणि एनआरआय पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर ठाणे मध्ये उल्हासनगर, कल्याण, मानपाडा, कोळसेवाडी आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाणे नवी मुंबई सोबत मुंबईत ही अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
 
नवी मुंबई पोलिसांनी रामनिवास मंजू गुप्ता याच्याकडून सव्वातीन लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. ज्यात नामांकित 17 विदेशी कंपन्यांच्या महागड्या दारुचा समावेश आहे.
 
दरम्यान, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर चासकर, पोलीस हवालदार जगदीश पाटील, शरद वाघ, दीपक सावंत, पोलीस नाईक विजय देवरे, किशोर फंड, पोलीस शिपाई प्रशांत वाघ, अजित देवकाते, उत्तेश्वर जाधव यांनी ही उत्तम कामगिरी केलेली आहे.