बोर्लीपंचतनमध्ये मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर

व्यापार्‍यांसह नागरिक हैराण

By Raigad Times    12-Sep-2021
Total Views |
free cattle problem_1&nbs
 
  • अपघातालाही मिळतेय निमंत्रण
  • गुरांच्या मालकांविरोधात कारवाईची मागणी
बोर्लीपंचतन । श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बाजारपेठेसह संपूर्ण गावामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांसह नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये वाहन चालविताना रात्रीच्या वेळेत रस्त्यामध्ये बसणार्‍या गुरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे आपल्या मालकीची गुरे रस्त्यावर सोडून देणार्‍या गुरांच्या मालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
 
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बाजारपेठेमध्ये सध्या गणेशोत्सवाच्या खरेदीची लगबग आहे. यामध्ये बोर्लीपंचतन गावासह विशेषतः आजूबाजूच्या गावातील गुरेमालक आपल्या गुरांना चारा उपलब्ध नाही किंवा त्यांची जोपासना करणे शक्य होत नसल्याने ती मोकाट सोडून देत आहेत. मागील वेळेस अशीच एक गर्भवती गाय बोर्लीमध्ये रस्त्यामध्येच व्याली होती. सध्या बोर्लीपंचतन बाजारपेठ व गावामध्ये सध्या अशीच शेकडो मोकाट गुरे मोकाट फिरत आहेत.

free cattle problem_2&nbs
 
मोकाट गुरे भाजीपाला दुकाने, किराणा दुकाने, उपहारगृहे यांचा विक्रीसाठी ठेवलेला मालाची नुकसान करीत आहेत. तर गावामध्येदेखील यांचा उपद्रव वाढत आहे. कधी कधी मोकाट गुरांमध्ये जुंपल्यामुळे गाड्याचे नुकसान होत आहे तर रात्रीच्या वेळेत मुख्य रस्तावर ठाण मांडून बसलेला कळप वाहनचालकांना नजरेत पडत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळते आहे. काही दिवसांपूर्वी वडवली फाट्याजवळ मोटारसायकलवरून येत असलेल्या मामा-भाच्याचा अपघात झाला. यामध्ये 5 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून सध्या मुंबई येथील वाडिया रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
 
अशा मोकाट गुरांमुळे होत असलेल्या अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित आहे. मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी याआधी कोंडवाडा पद्धत होती; परंतु आता कोंडवाडेच बंद झाल्याने गुरेमालक आता आपली गुरे बिनदिक्कत मोकाट सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरांचा वाढत असलेला उपद्रव पाहता आपली गुरे मोकाट सोडणार्‍या गुरे मालकांविरोधात कारवाई होईल का? असा प्रश्न संतप्त नागरिक करीत आहेत.
---------------------------------
मोकाट गुरांमुळे अपघात होत आहेत. शिवाय नागरिक व व्यापारीदेखील यामुळे त्रस्त आहेत. मोकाट गुरांच्या मालकांनी आपली गुरे आपल्या घरी गोठ्यामध्ये घेऊन जावी. पुढील आठवड्यात गुरे दिसली तर शिवसेना मोकाट गुरांना जवळच्या गोशाळेमध्ये घेऊन जाईल.
- नंदकिशोर भाटकर, शिवसेना शाखाप्रमुख, बोर्लीपंचतन