एका खांडीकडे दुर्लक्ष झाले अन् पुढे खारेपाटातील गणेशपट्टी हे संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाले!

अलिबाग तालुक्यातील गणेशपट्टी हे गाव आता जिल्ह्याच्या नकाशावरही दिसत नाही

By Raigad Times    12-Sep-2021
Total Views |
alibag_Ganeshpatti_Villag
 
राजन वेलकर/अलिबाग । पूर्वी येथे एक गाव होते. 30, 40 घरं गावात होती. गावात मराठी शाळा होती. मंदिर होते. अंगणात लहान मुलं बागडताना दिसायची, गुरा-ढोरांचा वावर असायचा... दसरा, दिवळी, गणेशोत्सव, अगदी हनुमान जयंतीदेखील मोठ्या उत्साहात साजरी व्हायची. शेतकरी इथला बाप होता. शेकडो खंडी धान्य तो या छोट्याशा गावात पिकवायचा. मात्र आता फक्त आठवणी उरल्या आहेत. एका छोट्या गोष्टीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आणि अलिबाग तालुक्यातील गणेशपट्टी हे गाव जिल्ह्याच्या नकाशावरुन कायमचे पुसले गेले आहे.
 
गणेशपट्टी गावात जाण्यासाठी आता रस्ता राहिलेला नाही. त्यामुळे चालत जाणे शक्य नव्हते. छोट्या होडीच्या सहाय्याने गावात जाता येेते. आम्हीही तेच केलं, अक्षय पाटील या तरुणाचे बोट धरुन मार्गक्रमण सुरु केले. एका लहानशा होडीने धरमतर खाडीतून वीस मिनिटे प्रवास केल्यानंतर आमची होडी एका निमुळत्या भागात शिरली. दोन्ही बाजूला असलेल्या कांदळवनातून मार्ग काढत अक्षयने एका दलदलीत होडी थांबवली. ढोपरभर चिखलातून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.

alibag_Ganeshpatti_Villag
 
गाव म्हणावे, अशा कोणत्याच खूणा दिसत नव्हत्या. माझ्या पुढे अक्षय होता. तो एका चौथर्‍याजवळ जाऊन थांबला. या ठिकाणी एकेकाळी मानवी वस्ती असावी याची पहिली खूण होती, ती म्हणजे एक मारुतीचे मंदीर. छप्पर उडालेले, भिंतींची दुरवस्था झालेली, दारे-खिडक्या नसलेल्या या ठिकाणी केवळ मारुतीची मूर्ती आहे म्हणून ते मंदिर होते. अक्षयने सांगितले या मंदिरासमोर आमची जिल्हा परिषदेची मराठी शाळा होती.
 
शाळा इमारतीच्या ठिकाणी मोठमोठी झाडे उगवल्याने त्याच्या म्हणण्याला दुजोरा मिळत नव्हता. अनवाणी पायाखालचा चिखल तुडवत आम्ही दोघेजण पुढे निघालो, आता काही घरे दिसू लागली होती. परंतु सर्व मोडकळीस आलेली. घरात चिखल, अंगणात कांदळवनाची झाडे उगवलेली, ओसरीला चिंबोर्यांची बिळे, इतरस्त्र पडलेली कौलं, वासे अशी सर्व भग्नावस्था पाहिल्यावर अक्षय पाटीलच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या भावंडांबरोबर लहानपण घालवलेल्या अक्षयला गावकर्यांसह वीस वर्षांपूर्वी गाव सोडावे लागले.

alibag_Ganeshpatti_Villag
 
प्रत्येकाची वीस ते तीस खंडी पिकती जमीन, पक्क्या बांधकामाची घरे सोडून 35 कुटुंबांना कायमचे स्थलांतर करावे लागले. पूर्वी घरासमोरच्या अंगणात लहान मुले, गायी-ढोरं बागडत असत. हनुमान जयंती, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात असे. याच्या केवळ आठवणी उरल्यात. आता या गावात फक्त चार ते पाच घरांच्या भिंती शिल्लक आहेत. अक्षयचे घर गावाच्या दुसर्या टोकाला आहे, त्याच्या घरापर्यंत कांदळवनातून जाणे शक्य नव्हते. त्यामुळे घरापर्यंत होडीतून जावे लागले.
 
भाताचे कोठार, देवघर, स्वयंपाकघर त्याने भरभर दाखवले. पडक्या घराकडे पाहून त्याच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. पटापट सांगू लागला. येथे अंगण होते, येथे तलाव होता, येथे भाताच्या उडव्या असायच्या. परंतु समोर काहीच दिसत नव्हते, सर्वत्र मोठ-मोठी कांदळवनाची गच्च झाडी दिसत होती. आता पावसाची रिमझिम सुरु झाली होती आणि भरतीचे पाणी देखील वाढू लागले होते, त्यामुळे परत सुरक्षितस्थळी पोहचण्यासाठी माझी घाई सुरु होती; परंतु अक्षय तेथेच आपल्या वाडवडिलांच्या जुन्या आठवणीत गुंतला होता.

alibag_Ganeshpatti_Villag 
शेवटी पावसाचा जोर वाढल्याने आम्ही पुन्हा कांदळवनातून तोच कसरतीचा प्रवास करत बंगला बंदरला आलो. पूर्वी बंगला बंदर येथून बांधावरुन गणेशपट्टीला चालत जाता येत असे; बांधाला एक लहानशी खांड गेली ती दुरुस्त झाली नाही. या खांडीनेच घात केला. राजकीय, शासकीय उदासिनतेमुळे खांड वाढत गेली. गणेशपट्टी खोलात चालली होती. 1980 पर्यंत येथील शेतकरी बांधबंदीस्ती स्वकष्टाने करीत असत. दरवर्षी बंधार्यांची दुरुस्ती नित्यनियमाने होत असे; परंतु याचदरम्यान खारलँड (खारभूमी) हे राज्य शासनाचे नवे खाते अस्तित्वात आले. येथूनच धरमतर खाडीतील हजारो शेतकर्यांची अधोगती सुरु झाली.
 
खारभूमीचा विकास करण्यासाठी जे खाते अस्तित्वात आले, त्याच खात्यातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे बंधार्‍यांची दुरुस्ती झालीच नाही. अधिकार्‍यांना जाब विचारणारी नेतेमंडळी नसल्याने अल्पशिक्षित शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत गेले. बांधबंदिस्ती करण्यात यावी, अशी विनंती गावकरी करत होते. पण त्याकडे पाहायची फुरसत कोणाकडेच नव्हती. हळहळू हजारो एकर उपजाऊ जमिनीमध्ये खारे पाणी शिरु लागले. उधाणाचे पाणी थेट गावात शिरु लागले.
 
हिंदवी स्वराजाचे सागरी आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांना सरखेलपद मिळाल्यानंतर त्यांचे हेडक्वार्टर सागरगड येथे होते. त्यावेळेस या परिसरात भातशेती कमी होती. सैनिकांना अन्नधान्य मिळावे, यासाठी धरमतर खाडी किनार्यालगतची जमीन उपजाऊ करण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपले सैनिक लावले. खाडी किनारी बांध घालून हजारो एकर जमीन पिकाखाली आणण्याची ती संकल्पना होती.
alibag_Ganeshpatti_Villag 
पुढे इंग्रजांच्या राजवटीत असा बांध घातल्यावर चांगली कसदार आणि भरपूर प्रमाणात भाताचे पीक देणारी जमीन तयार होईल, हे येथील चिखलकर, साखरकर यासारख्या सावकारांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या गावातून शेतमजूर आणून कामाला लावले. भगत कुटुंब अलिबागजवळील वेश्वी येथून आले, मुंढाणी येथून पाटील, चरी येथून थळे, वडाव-वाशी येथून म्हात्रे कुटुंब येऊन त्यांनी या परिसरातील हजारो हेक्टर जमीन अंगाखाली आणली. सांबरी ते धरमतर, पुढे धरमतर ते शहापूर, शहापूर ते रेवसपर्यंत टप्प्याटप्प्याने शेतकर्‍यांनी बंधारे बांधले. साधारण शंभर सव्वाशे वर्षे येथील शेतकर्‍यांनी भाताचे भरपूर उत्पन्न घेतले.
 
याचमुळे सांबरी ते रेवस या पट्ट्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असे. हे अस्तित्व 1990 पर्यंत कायम होते. मुंबईपासून जवळच आणि सागरी मार्गाने दळणवळणाला सोयीच्या असलेल्या जमिनीकडे 1990 च्या दरम्यान मोठ्या उद्योजकांचे लक्ष गेले.
धरमतर खाडीतील पीएनपी, जेएसडब्ल्यू बंदर अस्तित्वात आले. कारखानदारीसाठी भराव झाला. या भरावाचा परिणाम या परिसरात दिसू लागला असल्याचे म्हणणे आहे. खारभूमी अधिनियम 1979 च्या कलम 12 नुसार तीन वर्षे नापीक राहिलेली खारजमीन उद्योगांसाठी हस्तांतरीत करण्यासाठी खारलँड विभागाच्या परवानगीची गरज नाही. याचा फायदा उठविण्यासाठी ही जमीन नापीक कशी राहील, यासाठी प्रयत्न झाले. यात खारलँडच्या अधिकार्‍यांनीही हातमिळवणी केली. खार्‍या पाण्याची पातळी दरवर्षी वाढते आहे. पूर्वजांनी वर्षानुवर्षे केलेली मेहनत पाण्याखाली जात आहे.
 
ही परिस्थिती अजूनही कायम आहे. बहिरीचापाडा, माणकुळे, रांजणखार डावली या गावांमध्येही समुद्राचे खारे पाणी घुसत असते. या पाण्यात धरमतर ते रेवस, पलिकडे पेण खाडीपट्ट्यातील हजारो हेक्टर भाताची पिकती शेती पाण्याखाली गेलेली आहे. येथे मोठ-मोठी कांदळवनाची झाडे उगवल्याने या जंगलात शिरण्याचीही हिंमत होत नाही. हा प्रकार असाच सुरु राहिल्यास आणखी काही गावांना कायमचे स्थलांतर करावे लागेल. याची सुरुवात गणेशपट्टीपासून झाली आहे.
 
अलिबाग तालुक्यातील ‘हे’ गाव जिल्ह्याच्या नकाशावरुन कायमचे पुसले गेले....पहा पूर्ण स्टोरी....