माणगाव एसटी बस डेपोची दयनीय अवस्था

31 Aug 2021 18:12:20
mangaon bus depo_1 &
 
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची प्रवासीवर्गाची मागणी
 
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचे महत्वाचे शहर आहे. माणगाव शहरात असणार्‍या एसटी बस स्थानकाची सद्यस्थितीत दयनीय अवस्था झाली आहे. बस स्थानकाच्या आवारात भले मोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीतून एसटी चालक बसस्थानकात बस घेऊन येतात तसेच प्रवासीदेखील चिखलातून मार्ग काढत बसस्थानक गाठतात. पण या सार्‍या गोष्टींकडे एसटी प्रशासन लक्ष घालीत नाही. म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव बसस्थानकाला भेट देऊन प्रवाशांच्या समस्या दूर करण्याची मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.
 
माणगाव बस स्थानक हे तीस-चाळीस वर्षांपूर्वी बांधलेले असून आता ते अनेक ठिकाणी गळत आहे. स्थानकातील स्लॅब तर भर पावसात एसटी प्रशासनाने तोडून टाकले असून प्रवासी भर पावसात उभे राहून एसटीची वाट पाहत असतात.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे महत्वाचे ठिकाण असून म्हसळा, श्रीवर्धन, पुणे, मुंबई, महाड याठिकाणी जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी माणगाव स्थानकात येत असतात. माणगाव तालुका हा ग्रामीण भागात व्यापलेला असल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी एसटीचा आसरा घ्यावा लागतो. माणगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज शासकीय कामासाठी तसेच खरेदीसाठी नागरिकांना बसने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात बस स्थानकात पाणी गळत असल्याने प्रवासी पाण्याने भिजून ओलेचिंब होत असून प्रवाशांचे हाल होत आहेत; पण हे सर्व राज्य परिवहन महामंडळाला दिसत नाही.
 
गौरी गणपतीचा सण तोंडावर आल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी तसेच कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी आता गर्दी होणार असून गर्दीच्या वेळी बसस्थानकात बसायला तर सोडाच पण उभे राहण्यासाठी पण प्रवाशांची सोया नाही. प्रवासी जीव मुठीत घेऊन बस स्थानकात उभे राहतात. बस स्थानकांच्या आवारात तर मोठ मोठे खड्डे पडले असून एसटी प्रशासनाने त्या खड्ड्यात चिखल, माती टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रकार केला असून अशा चिखलातून मार्ग काढीत प्रवाशांना बस स्थानकात यावे लागते.
 
पावसाळ्यात बसस्थानकातील छप्पर तोडून ठेवल्याने प्रवाशांना बसायला जागाच नाही. स्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव बस स्थानकाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून बस स्थानकातील समस्या दूर कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0