श्रीवर्धन-म्हसळ्यात खतांचा तुटवडा

27 Aug 2021 13:06:35
new_1  H x W: 0
 
जिल्ह्यात कारखाना असूनही खतांसाठी शेतकर्‍यांची वणवण
 
दांडगुरी | रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी झाल्यानंतर पिके ऐन बहरलेल्या अवस्थेत आहेत.पिकांना सध्या खतांची आवश्यकता असताना ऐन हंगमातच शेतकर्‍यांना खतांच्या टंचाईला सोमोरे जावे लागत आहे. मागणी केलेली खते मिळत नाहीत, मागणी करूनदेखील कंपन्यांकडून खाते मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
 
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे. रासानिक खत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकर्‍यांना अपेक्षित असलेली खते मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. अनेक भागात शेतकर्‍यांना युरियाचा तुटवडा आजही जाणवत आहे.
 
इतरही अनेक खते मागणीनुसार मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. येत्या आठ दिवसांत खतांचा पुरवठा नाही झाल्यास खरीप पिकांचे प्रचंड नुकसान होईल, अशी भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
 
---------------------------------------------------------------------------------------
 
बोर्लीपंचतन व वडवली येथे खतेच नाही त्यामुळे लावणीनंतर शेतीला खत देण्याची वेळ निघून चालली आहे. शेतकर्‍यांना खते वेळेत मिळावी, ही आमची मागणी आहे. चंद्रकांत चाळके, सरपंच - शिस्ते
 
------------------------------------------------------------------------------------------
खतेच नाही तर काय करणार भात लावणीनंतर रोपे उभी राहिलेली असताना खत मात्र ती विशिष्ट वेळेतच मारावी लागतात. वेळ निघून गेल्यावर त्याचा परिणाम असा की उत्पादन कमी होते. मग वेळ निघून गेल्यावर खते मारून काय फायदा? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
 
---------------------------------------------------------------------------------------------
 
कारखाना जिल्ह्यात अन् जिल्ह्यातच तुटवडा रायगड जिल्ह्यातील थळ येथे खत निर्मितीसाठी आरसीएफ कारखाना आहे. मात्र जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा सारख्या हजारो हेक्टर शेती असलेल्या भागात शेतकर्‍यांना खतासाठी वाट पहावी लागते. कंपनी व्यवस्थापनाने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची शेतकरी मागणी करत आहेत. त्याचबरोबर खत खरेदीसाठी स्थानिक कृषी केंद्राकडे गेले असता अनेकदा खत उपलब्ध नसल्याचे सांगतात. यामुळे अनेकदा वाद झाल्याची घटना घडल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0