तळा : पोलीस अंमलदार अनंत घरत यांची तत्परता; सर्पदंश झालेल्या मुलीला मिळाले जीवदान

By Raigad Times    18-Aug-2021
Total Views |
 tala_1  H x W:
 
रुग्णवाहिका नसल्याने स्वतःच्या गाडीतून नेले रुग्णालयात 
 
 तळा । तळा ठाण्याचे पोलीस अंमलदार अनंत घरत यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे एका सर्पदंश झालेल्या मुलीला जीवनदान मिळाले आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच्या गाडीने या मुलीला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तिला वेळेत उपचार मिळाले आणि ती बरी झाली.
 
12 ऑगस्ट रोजी रोवळा येथे राहणार्‍या ज्ञानेश्वरी रमेश शिगवण हिला साप चावला. त्यामुळे प्रथमोपचाराकरिता तळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन ज्ञानेश्वरीला ताबडतोब माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र रुग्णवाहिका दुसर्‍या रुग्णाला घेऊन गेल्याने ज्ञानेश्वरीला माणगावला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.
 
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार अनंत प्रभाकर घरत यांनी ज्ञानेश्वरीला क्षणाचा विलंब न लावता गाडीतून माणगाव जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने ज्ञानेश्वरी शिगवणचे प्राण वाचले असून, तिची तब्येत व्यवस्थित आहे.
 
दरम्यान, पोलीस अंमलदार अनंत घरत यांनी आपले कर्तव्य चोख बजावल्याने त्यांचे कौतुक होत असून, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस धनराज गायकवाड व आर.डी.सी.बँकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर यांनीही तळा पोलीस येऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.