प्रवासी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास
अलिबाग | मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत, हे खड्डे भरण्यासाठी खडी आणि मातीच्या भराव केला जात आहे. त्यामुळे महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले
आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांनी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत.
पावसाळा सुरु झाला की मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे अवतारकार्य सुरु होते. हे अवतारकार्य डिसेंबर महिन्यापर्यंत सुरु राहते. गणेशोत्सवाच्या सुरवातीलामहामार्गाच्या दुरवस्थेचा विषय चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महामार्गाच्या परिस्थितीची चर्चा रंगते. पहाणी दौरे आणि आढावा बैठका होतात. थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. मात्र पुन्हा पाऊस आला की चेहर्याचा मेकअप उतरावा तशी परिस्थिती महामार्गाची होते. खड्डयांचे आदळत आपटत, धूळीतून वाट काढत कोकणवासियांचा प्रवास सुरुच रहातो. गेली नऊ वर्षे थोड्या फार फरकाने हिच परिस्थिती कायम आहे. पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरु झाले.

हे काम २०१४ मध्ये पूर्ण होण अपेक्षित होते. मात्र २०२१ चा उत्तरार्ध सुरु झाला तरी हे काम पुर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीत. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या दुसर्या टप्प्यातील कामाची परिस्थिती फारशी चांगली नाही. महामार्गाची आजची परिस्थिती दयनीय आहे. गडब ते इंदापूरदरम्यान महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. माणगाव ते महाड दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी खडी आणि मातीचा वापर केला जात आहे. यामुळे महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या खड्यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा आणि रखडलेली कामे मार्गी लावा अशी मागणी केली जात आहे.
----------------------------------------------------------------
पळस्पे ते इंदापूर पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम यापुर्वीच सुरु झाले आहे. ८४ किलोमिटरच्या या मार्गासाठी एकुण २१७ हेक्टर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भुसंपादनासाठी ४७६ कोटी रुपये प्राप्त झाले होते. २०११ साली या कामाला सुरवात झाली. पळस्पे ते वडखळ पयरतचे काम अंतिम जवळपास पुर्ण झाले आहे. मात्र वडखळ ते इंदापूर दरम्यांनच्या कामाला अद्याप अपेक्षित गती मिळू शकलेली नाही.
------------------------------------------------------------------
इंदापूर ते कशेडी दुसरा टप्पा
दुसर्या टप्प्यात इंदापुर ते कशेडी या ७१ किलोमिटर मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी ४७ गावातील २३० हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. जमिन संपादनाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. मात्र ७१ किलोमीटर पैकी फक्त १९ किलोमीटर रस्त्याचे काम पुर्ण होऊ शकले आहे. उर्वरीत काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.
-------------------------------------------------------------------
खड्ड्यांचे साम्राज्य कुठे....
महामार्गावार केंबुर्ली वहूर, नातेखिंड, चांभारखिंड, नांगलवाडी फाटा, भोर फाटा परीसरात महामार्गाची परिस्थिती दयनीय आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत. याशिवाय दिघवली, रातवड येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे.
सुकेळी खिंड ते नागोठणे. नागोठणे ते वडखळ दरम्यान रस्त्याची दूरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
----------------------------------------------------------------------
महामार्गाची परिस्थिती खूपच भयानक आहे. खड्डयामुळे महामार्गावर गाड्या चालवणे कठीण जात आहे. वाहतुकीचा वेगही मंदावलेला आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
- राजेश म्हात्रे, वाहन चालक