नगरपालिकेने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी
माथेरान | माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी धूळविरहीत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. काही ठिकाणी एमएमआरडीए मार्फत तर काही ठिकाणी नगरपालिकेच्या निधीतून ही कामे सुरु आहेत. यामध्ये पांडे प्ले ग्राऊंड ते शार्लोट लेक रस्त्याच्या कामात निकृष्ट प्ले पेव्हर ब्लॉक तसेच ठेवून काम रेटले जात असल्याने माथेरानकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
माथेरानमध्ये सध्या पर्यावरण पूरक अशा क्ले पेव्हरने रस्ता बनविण्यास पर्यावरण सनियंत्रण समितीची परवानगी असल्याने मोठ्या प्रमाणात कामे सरु आहेत. यामध्ये पांडे प्ले ग्राऊंड ते शार्लोट लेक रस्ता क्ले पेव्हर वापरुन धूळविरहित करण्यात येत आहे.मात्र याठिकाणी मागील वर्षी जवळजवळ पन्नास फूट रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यासाठी वापरण्यात आलेले क्ले पेव्हर निकृष्ट दर्जाचे असल्याने हे काम बंद करण्यात आले होते. स्थानिकांच्या आक्षेपांमुळे हे काम थांबविण्यात आले होते. माथेरानमधील अतिमहत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये मोडणारा शार्लोट लेक हा प्रमुख पॉईंट आहे
त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. पालिकेने हा रस्ता चांगला व्हावा, म्हणून हे काम तातडीने सुरु केले होते, मात्र मागील दोन अडीच वर्षे होऊनही काम पूर्णत्वास गेले नाही. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे क्ले पेव्हर लावून घाईगडबडीत केलेल्या कामावर आक्षेप घेतल्यानंतर हे ब्लॉक काढून त्या ठिकाणी योग्य ब्लॉक बसविण्याचे सदर ठेकेदाराला पालिकेकडून सांगण्यात आलेहोते. मात्र सद्यस्थितीत सदर काम तसेच ठेऊन ठेकेदाराने पुढील काम उरकत घेतले असल्याचे दिसून येत आहे. हे काम आता पूर्णत्वास आले असून रद्द करण्यात आलेले ब्लॉक काढणार की नाही? अशी विचारणा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
सध्या सुरु असलेले कामही सरळ नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून हा रस्ता पालिकेकडे वर्ग करण्याअगोदरच काही ठिकाणी हे ब्लॉक वर खाली झाल्याचे दिसून येत आहेत. अशा प्रकारचे काम होत असताना नगरपालिकेचे अभियंते ह्या ठिकाणी फिरकतातं की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. निकृष्ट कामामुळे पालिकेचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता असल्याने याकडे संबंधित खात्याने तातडीने लक्ष देण्याची गरज स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.