अलिबाग | रायगड जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागातील विविध अधिकार्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात झाल्या आहेत. तसेच अन्य जिल्ह्यातील अधिकार्यांच्या बदल्या होऊन त्यांना रायगड जिल्हयात नियुक्ती देण्यात आली आहे. या बदल्या प्रशासकीय असल्याचे महसूल विभागाच्या शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खालापूरचे तहसिलदार आय. जी. चप्पलवार यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण तहसिलदार म्हणून बदली झाली आहे. तर माथेरानचे अधिक्षक बापूराव भोई यांची भिवंडी येथे अकृषिक तहसिलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांची मेट्रो सेंटर १ पनवेल येथे उपजिल्हाधिकारी या रिक्त पदावर बदली झाली आहे. तर रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांची बदली झाली असून त्यांना रत्नागिरी जिल्हयातील राजापूर प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी ठाकूर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण १ ठाणे येथे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांची सिंधुदुर्ग जिल्हयात सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
मुंबई शहरच्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांना रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. भांडूपचे उपजिल्हाधिकारी अजित नैराळे यांना कर्जत उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
संबंधित बदली झालेल्या अधिकार्यांना नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ती गैरवर्तणूक समजून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही महसूल विभागाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.