पनवेल । पनवेल तालुक्यातील पोयंजे येथील नदीत बुडालेल्या 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह तिसर्या दिवशी सापडला आहे. निसर्गमित्र, अग्निशामक दल, स्थानिक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
18 जुलै रोजी कळंबोली येथील दीपक गंभीरसिंग ठाकूर आणि त्याचे मित्र पोयंजे येथील नदीवर मौजमजा करण्यासाठी गेले होते. यावेळी दिपकला पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. त्याला मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केले; मात्र ते अयशस्वी ठरले. याची माहिती तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांना देण्यात आली.
त्यांनी दीपकला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र रविवारी आणि सोमवारी नदीला पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीला पाणी वाढत जात होते. अखेर तिसर्या दिवशी मंगळवारी (20 जुलै) दुपारी निसर्ग मित्र अग्निशामक दल आणि पोलीस यांच्याकडून शोधकार्य सुरु असताना, दुपारच्या सुमारास दीपक सिंगचा मृतदेह नदीत सापडला.