उरणमध्ये मुसळधार पाऊस! ग्रामीण रुग्णालयासह अनेकांच्या घरात शिरले पाणी

By Raigad Times    18-Jul-2021
Total Views |
heavy rain in Uran_1 
उरण । गेले दोन दिवस उरण तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले असून येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातही पावसाचे पाणी भरले होते. शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे अनेकांच्या घरांना पाणी घुसले आहे.
 
उरण तालुक्यातील गोरगरीब, सामान्य माणसांसाठी महत्वाच्या असणार्‍या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी रात्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे रुग्णालयातील कर्मचार्‍यांची पाणी उपसण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. येथील भाग हा खोलगट असल्याने डुक्करखार हा भाग प्रत्येक पावसामध्ये पाण्याखाली येतो.
 
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय हे बांधताना भराव करुन, उंचावर बांधण्यात आल्याने या रुग्णालयामध्ये पाणी साचण्याचा प्रकार घडत नव्हता. मात्र, आजूबाजूला होणारे भराव आणि नगरपालिकेने अधिक उंच केलेले रस्ते यामुळे रुग्णालयाचा भाग हा इतर भागापेक्षा खाली आला आहे. यामुळे आता समुद्राच्या भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यास या रुग्णालयात पाणी भरण्याच्या घटना घडतात. शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अशाच समस्येला सामोरे जावे लागले आहे. ज्यामुळे येथील कर्मचारी आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

heavy rain in Uran_1  
 
इनामदार नगर, कुंभारवाडा, डुक्करखाडी आणि बोरी मार्गावर मुसळधार पडणार्‍या पावसामुळे नेहमीच पाणी भरण्याच्या घटना घडत असतात. यामुळे येथील रुग्णांचे पावसाळ्यात हाल होतात. या गोष्टीकडे नगर पालिकेने गांभीर्याने पाहून, पाणी बाहेर जाण्याचे मार्ग मोकळे करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर या भागात अनेक ठिकाणांहून पाणी येत असल्याने येथील नाले मोठे आणि अधिक खोल व्हावे, अशीही प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
 
बोरी इनामदार नगर येथील आंनद कुलकर्णी यांच्या घराच्या बाजूचा भाग उंच होऊन त्यांचे घर खाली गेले आहे. तसेच आजूबाजूला भराव झाल्याने पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे त्यांच्या घरात गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर घरात पाणी येऊन रात्र जागून काढावी लागत आहे. तसेच घरातील सामानाची ही खराबी होत आहे. तरी नगरपालिकेने या भागातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना केल्यास यातून सुटका होईल, असा विश्वास आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.