जावयाने केली सासर्‍याची हत्या; सासू जखमी

By Raigad Times    16-Jul-2021
Total Views |
Murder_Roha_Crime News_1&
 
  • रोहा वरसेतील घटना; खुनी जावई अटकेत
धाटाव (शशिकांत मोरे) । तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील एकदंत सोसायटीमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासरे दादुराम बोराणा (वय ५०) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवर देखील धारदार हत्याराने वार करून सासूला देखील जखमी केले आहे.
 
रोहे बाजारपेठेतील व्यावसायिक दादूराम बोराणा यांच्या मुलीचा विष्णू देसाई (रा. सेवादल आळी रोहा) याच्याशी प्रेमविवाह झाला होता. पण विष्णू देसाई याची पत्नी लग्नाच्या वर्षभरानंतर त्याला सोडून गेली होती. आपल्या पत्नीला तिच्या माहेरच्या लोकांनीच गायब केल्याचा संशय विष्णू देसाई याला होता.

Roha Murder Case_2 &
 
'माझी बायको कुठे आहे' याचा जाब विचारण्यासाठी विष्णू सासरे दादूराम बोराणा यांच्या घरी गेला होता. पण 'आम्हाला तुझ्या बायकोबद्दल माहित नाही' असे त्याला वारंवार सांगण्यात येत होते. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून आज दुपारी दीडच्या सुमारास विष्णू तलवार व अन्य धारदार हत्यारासह आपल्या सासऱ्याच्या घरी गेला. माझी बायको कुठे आहे? असे विचारू लागला. परंतु आम्हाला तिच्याबद्दल काही माहित नाही, असे सासऱ्याने सांगितल्याने त्याने धारदार शस्त्राने सासऱ्यावर वार केले.

Roha Murder Case_1 & 
 
त्यानंतर सासऱ्याला जिन्यावरून फरफटत बिल्डिंगच्या खाली नेऊन वार केले. संपूर्ण परिसरात रक्ताचे थारोळे पसरले होते. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवरदेखील जावयाने वार केल्याने तीदेखील गंभीर जखमी झाली असून रोहा उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
 
सदर घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली असून विष्णू देसाई याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.