रुग्णाच्या नातेवाईकांकडून वॉर्डबॉयला मारहाण; शिवीगाळ करुन केली दमदाटी!

By Raigad Times    15-Jul-2021
Total Views |
Mangaon Hospital News_1&n
 
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; गुन्हा दाखल
 
माणगाव । जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्डबॉयला मारहाण करुन, शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही घटना 13 जुलै रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली. वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय 23, रा.वावे हवेली ता.तळा) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जनार्दन पारावे, डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित होते. यावेळी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेल्या महिला रुग्णाच्या दोन नातेवाईकांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असतानाही दुसरे दोन सिलेंडर टाका, अशी मागणी केली.
 
त्याप्रमाणे जनार्दन पारावे यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवूनही त्यांना डाव्या कानाखाली मारुन दुखापत केली. तसेच त्यांना शिवीगाळी व दमदाटीही करण्यात आली. यावेळी पारावे यांचा चष्मा खाली पडून नुकसान झाले. मारहाण करणारे रुग्णाचे नातेवाईक हे भावे पिंपळदरी ता. महाड येथील राहणारे आहेत. या दोघांवरही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 353, 332, 427, 504, 506, 34, महा.वैद्य.सेवा व्याप्ती. वैद्य.सेवा. संख्या हिंसक कृत्य व मालमत्तेची नुकसान प्रति.अधि.सन 2010 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.