कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
पोलादपूर (शैलेश पालकर) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या महाड तालुक्यातील वीर ते पोलादपूर तालुक्यातील कातळी बंगल्यापर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेणार्या एलऍण्डटीने वेगवान काम सुरु केले आहे. मात्र अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते फुटल्याचे दिसून येत असून, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीकडून केल्या जाणार्या कामाचा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दर्जा व गुणवत्ता नियंत्रणाचा सोपस्कार पूर्ण करुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अलिकडेच, कशेडी घाटातील रस्त्याची पूर्णपणे वाट लागलेली दिसून येत असताना कशेडी घाटात सुरुवातीलाच असलेल्या सुंदरराव मोरे महाविद्यालयापासून काही अंतरावर दोन दिवसांपासून काँक्रीटच्या महामार्गाला सुमारे 150 फूट अंतरापर्यंत तडे गेलेले दिसून आले आहेत.
पोलादपूर तालुक्यात अनेक वेळा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनी एलअँडटीकडून केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, एवढी निकृष्ट दर्जाची कामे झालेली दिसून येत आहेत. यामध्ये गटाराचे स्लॅबचे काम कमकुवत असल्याने ढासळणे, काँक्रीट रस्त्याला तडे जाऊन कालांतराने स्लॅबमधील खडी बाहेर पडून खड्डा तयार होणे, पुलाच्या भरावाच्या संरक्षक भिंतींना लावलेले काँक्रीटच्या स्क्वेअरच्या आतील बाजूला मातीच्या भरावामध्ये पाणी साठून पुढे येणे, असे सर्रास प्रकार दिसून येत आहेत.
यापूर्वी, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणावेळी बांधण्यात आलेला काँक्रीट रस्ता असा मोठा तडा गेल्याचे एलऍंडटी ठेकेदार कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तो सिमेंटच्या पाण्याने सारवून झाकण्यात आले. आता कशेडी घाटातील चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयापासून काही अंतरावरील या मोठ्या तड्यासाठी एलऍंडटी ठेकेदार कंपनी कोणते नवीन बांधकाम तंत्र वापरणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कशेडी घाटातील भुयारी मार्गाकडे जाण्यापूर्वीचा पोलादपूर तालुक्यातील कातळी बंगल्यापर्यंत रस्ता एलऍंडटी ठेकेदार कंपनीकडून पूर्णत्वास जाणार असल्याने या रस्त्याच्या दर्जाकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.