पोलादपूर : मोरीवरुन कार कोसळली नाल्यात

By Raigad Times    08-Jun-2021
Total Views |
 poladpur web_1  
 
सुदैवाने जीवितहानी नाही; लोहारमाळ येथील घटना
 
पोलादपूर । मुंबई-गोवा महामार्गावरील लोहारमाळ येथील मोरीवरुन भरधाव कार नाल्यात पडून अपघात झाल्याची घटना आज (8 जून) पहाटे घडली. मोरीच्या बांधकाम परिस्थितीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
 
पोलादपूर तालुक्यात सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामध्ये फ्लायओव्हर, सर्व्हीस रोड, अंडरपास, संरक्षक भिंती, संरक्षक कठडे, साईडपट्ट्या, बॉक्सकटींग असे प्रकार सुरु आहेत. सर्वच कामे अर्धवट स्थितीत असताना पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरु झाल्याने या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.
 
लोहारमाळ ते पार्ले दरम्यानच्या बांधावरच्या बाबा उर्फ बांदलबाबा तसेच आईसाहेब हॉटेल याठिकाणी आज पहाटेच्या सुमारास एक कार रस्त्यावरील मोरीच्या बांधकाम परिस्थितीचा अंदाज न आल्याने अपूर्ण असलेल्या दोन मोर्‍यांच्या मधल्या भागात कोसळली.
यावेळी पाऊस असल्याने कारच्या खिडक्या बंद होत्या. यामुळे कारमधील प्रवासी व चालकांना अपूर्ण कामातील लोखंडी गजांपासून कोणतीही दुखापत अथवा जखमा झाल्या नाहीत आणि ते बालंबाल बचावले. कारच्या दरवाजांची मात्र मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
 
पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन नाल्यातून बाहेर काढण्यासाठी एलऍण्डटी ठेकेदार कंपनीच्या क्रेनचा वापर केला. तसेच खासगी क्रेनने वाहन दुरुस्तीसाठी रवाना केले.