म्हसळा : जनकल्याणच्या रुग्णसेवेमध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दाखल

By Raigad Times    08-Jun-2021
Total Views |
 mhasala news_1  
 
दक्षिण रायगडमधील 9 तालुक्यांमध्ये 23 मशिन कार्यरत
 
म्हसळा/सुशील यादव । म्हसळा तालुक्यात ‘जनकल्याण संस्था-रायगड’मार्फत सार्वजनिक वाचनालय येथे रुग्णसेवा केंद्र सुरु आहे. जनकल्याण संस्थेकडून कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी येथे दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दाखल झाले आहेत.
 
रुग्णसेवा केंद्रामधून गरजू रुग्णांना कॉट, व्हिल चेअर, वॉटर बेड, एअर बेड, ट्रॅक्शन किट, टॉयलेट चेअर, विविध साईजच्या कुबड्या, नेब्यू लायझर इत्यादी साहित्याच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु आहे. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची सेवा सुरु झाल्याने कोरोना संक्रमित रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी या मशिनचा चांगला उपयोग होणार असल्याचे रा. स्व. संघ जनकल्याण समिती-रायगडचे अध्यक्ष जयेश छेडा यांनी म्हसळा संघाला दोन मशीन देताना सांगितले.
 
यावेळी कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे, सहकार्यवाह अमेय भावे उपस्थित होते. मेकींग द डिफरन्स संस्थेने सेवाभाव म्हणून रायगडला 23 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दिले असून, म्हसळ्याप्रमाणे महाडला 4, पोलादपूरला 2, माणगावला 4, श्रीवर्धनला 2, तळा 1, रोहा 4, मुरुड 2, पाली 2 अशा मशिन वितरीत केल्या असल्याचे पुरुषोत्तम कुंटे यांनी सांगितले.
 
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर कसे कार्य करते?
 
कॉन्संट्रेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. हवेमध्ये सर्वसाधारणपणे 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन वायू असतो. बाकीच्या वायूंचे प्रमाण केवळ 1 टक्का आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटरमध्ये ही हवा आत घेतली जाते आणि नंतर ती फिल्टर होते. नायट्रोजन याद्वारे परत हवेत सोडला जाते. या प्रक्रियेद्वारे कॉन्संट्रेटरमध्ये वापरल्या जाणार्‍या ऑक्सिजनचा उपयोग करुन रुग्णाच्या ऑक्सिजनची कमतरता पूर्ण केली जाते, अशी माहिती डॉ. श्रीमती देशमुख यांनी दिली