दिघी-माणगाव मार्गावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

By Raigad Times    08-Jun-2021
Total Views |
borli panchatan news_1&nb
 
रस्ता ओलांडताना लहान मुली मृत्यूच्या दारातून बचावल्या
 
साहील रेळेकर / बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यात असणार्‍या दिघी पोर्टमुळे दिघी-माणगाव मार्गावर अनेक अवघड वाहने नियमितपणे ये जा करत असतात. दिघी पोर्ट मधून आयात-निर्यात करताना दिवसरात्र अवजड वाहने या मार्गावरून वाहतूक करताना अनेकदा वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळे यापूर्वीही वडवली, वेळास, दिघी परिसरात अनेक अपघात घडले आहेत. या मार्गावर अनेक लहान गावे रस्त्यालगत असल्याने नागरिकांची नियमित वर्दळ असते. परंतु या मार्गावर गतिरोधक नसल्याने काही वेळेस भरधाव वाहनांमुळे अपघाताचे प्रसंग ओढवतात.

borli web_1  H  
 
तसेच श्रीवर्धन तालुका पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असल्याने असंख्य पर्यटक याठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाहने या मार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळे गतीरोधकांच्या अभावी गावातील नागरिकांना जिव मुठीत धरून चालावे लागत आहे. गावातील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांमुळे मोठे जिकरीचे ठरते.
नुकतेच वेळास या गावाजवळ घडलेल्या एका घटनेत दोन मुली रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात असणार्‍या कारखाली येताना बालंबाल बचावल्या. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर गतिरोधक नसल्याने किती भयावह परिस्थितीत नागरिक जगत आहेत याचा प्रत्यय सर्वांना येत आहे.
 
माणगाव दिघी मार्गावर रस्त्यालगत असणार्‍या गावांजवळ आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची ’हेल्प ग्रुप’ने वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता तरी बांधकाम खात्याला जाग येईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा दुर्दैवाने एखादी अनुचित घटना घडल्यास त्याचे श्रेयही सार्वजनिक बांधकाम खात्यालाच द्यावे लागेल.