पाली, परळी, उन्हेरे फाट्यावर आरोग्य विभागाकडून चाचण्या
पाली/बेणसे । कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करुन विनाकारण, विनामास्क फिरणार्यांची सोमवारी (7 जून) तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन चाचणी करण्यात आली. पाली, परळी व उन्हेरे फाट्यावर एकूण 63 जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये 7 जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.
पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण थळे, रुपेश मुसळे, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल चांदोरकर, हेमंत कुथे, राजेंद्र राठोड, शंकर साळवे, होमगार्ड सचिन माडे, स्वप्नील पालकर, राहुल दिघे, अॅम्बुलन्स चालक समाधान भगत, वीरसिंग कुशवाह व जयेश बावकर हे सहभागी झाले होते.
तहसीलदार दिलीप रायण्णावार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण, विनामास्क फिरणार्या नागरिकांना चांगलाच दणका बसला आहे.
----------------------------------
सर्वच नागरिकांनी शासन नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच योग्य खबरदारी व काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणे व सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
- डॉ. शशिकांत मढवी,
तालुका वैद्यकीय अधिकारी, सुधागड