पेण : वडखळ सरपंच राजेश मोकल यांचा भाजपचा राजीनामा

By Raigad Times    07-Jun-2021
Total Views |
Vadkhal_grampanchayat_Pen 
 
पेण । नुकतेच 13 सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाविरोधात जनतेतून विश्वासाने निवडून आलेले पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश भिकाजी मोकल यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. मोकल यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे.
 
राजेश मोकल यांना मानणारा मोठा वर्ग वडखळ, बोरी, शिर्की, वाशी विभागात आहे. राजेश मोकल यांच्या पत्नी पूजा मोकल याआधी पंचायत समितीच्या वडखळ गणातून निवडून आल्या होत्या. नंतरच्या निवडणुकीत राजेश मोकल हेही पंचायत समितीच्या वडखळ गणातून निवडून आले होते.
 
त्यानंतर झालेल्या जनतेतून थेट सरपंच निवडणुकीत ते निवडून येऊन सरपंचपदाची धुरा त्यांनी सांभाळली. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. नुकताच त्यांच्यावर 13 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
 
तो मंजूर झाल्यानंतर ग्रामसभा होऊन जनतेने पुन्हा राजेश मोकल यांच्या बाजूने मतदान करत, त्यांना पुन्हा सरपंचपदावर विराजमान होण्याची संधी दिली. दरम्यानच्या घडामोडीत भाजप नेतृत्वाने अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने राजीनामा देत असल्याचे राजेश मोकल यांनी सांगितले आहे.
 
दरम्यान, राजेश मोकल यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची जोरदार चर्चा पेणमध्ये सुरु आहे.