- निर्बंध शिथिल होत असले तरी हलगर्जीपणा नको
- रोहा येथील संयुक्त बैठकीत आ.अनिकेत तटकरे यांचे आवाहन
रोहा । ‘अनलॉक’च्या सुधारित आदेशानुसार काही प्रमाणात शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाचे आव्हान अजून कायम असल्याने हलगर्जीपणा नको. व्यापारीवर्गाने आरटीपीसीआर किंवा अँटीजेन चाचणी करणे बंधनकारक असून सर्वांनी कोरोना नवीन नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आ.अनिकेत तटकरे यांनी केले आहे.
आज (7 जून) रोहा येथील शासकीय अधिकारी आणि व्यापारी वर्ग यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, तहसीलदार कविता जाधव, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजय मोरे, नगरसेवक राजू जैन, महेंद्र गुजर, मयूर दिवेकर, महेश कोलटकर, सिटीझन फोरमचे निमंत्रक अप्पा देशमुख, व्यापारी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोहा शहरासमवेत सर्वत्र हळूहळू व्यापार, उद्योग, व्यवसाय व बहुतांश दुकाने सुरु होत आहेत. याकरिता प्रत्येक व्यापारीबांधवाने आरटीपीसी आर किंवा अँटीजेन चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आ. अनिकेत तटकरे यांनी केले.
लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन रोहे शहरातील व्यायापरी बांधवाकडून होत आहे. असे असताना इतर ठिकाणी मात्र नियम पायदळी तुडविले जातात. याविषयी प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, असेदेखील आ.तटकरे यांनी सांगितले.
येत्या तीन दिवसांत सोने, चांदी व्यापारीमंडळ अँटीजेन चाचणी करून घेणार असल्याचे राकेश जैन यांनी सांगितले. तर प्रांताधिकारी डॉ.माने यापुढे शनिवारी-रविवारी बाजारपेठ बंद न ठेवता सुरु ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी नव्या नियमावलीतील नियम सर्वांना समजावून सांगितले.
--------------------------------------------
रोह्यातील व्यापारी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत असून व्यापारी वर्गाने अँटीजेन चाचणी करुन घेण्यासाठी आमचा प्राधान्यक्रम राहील. आम्ही एक समिती स्थापन करीत असून त्या माध्यमातून सक्तीने ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
- राजेंद्र जैन,
व्यापारी प्रतिनिधी तथा नगरसेवक