पोलादपूरचे शहीद राकेश सावंत यांचा स्मृतीदिन साजरा

By Raigad Times    07-Jun-2021
Total Views |
poladpur web news_1 
 
पोलादपूर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथील शहीद राकेश तात्याबा सावंत यांचा स्मृतीदिन कौटुंबिक पातळीवर आप्तपरिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
 
शहीद परंपरा असलेल्या पोलादपूर तालुक्यातील सेवाकाळात युध्दभूमीवर अपघाती वीरमरण आलेल्या शहीद राकेश सावंत यांच्या परिवाराने यावर्षी या स्मृतीदिन कार्यक्रमाचे मर्यादित स्वरुपात आयोजन करुन सामाजिक बांधिलकी दर्शविली.
 
6 जून 2009 रोजी युध्दक्षेत्रात सेवेत असताना वाहन अपघातात राकेश तात्याबा सावंत हे शहीद झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी रायगड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉर्डन लिडर दीपक नाईक यांच्या उपस्थितीत शहीद राकेश सावंत यांचा पुतळा सावंतकोंड येथील त्यांच्या निवासस्थानी बसविण्यात आला.
 
यानंतर त्यांच्या निवासस्थापासून सावंतकोंड रस्त्यापर्यंत जोडरस्ता करण्यात येऊन गेल्या वर्षी कमानही उभारण्यात येऊन लोकार्पण करण्यात आले. रविवारी (6 जून) वीरपिता तात्याबा सावंत आणि वीरमाता यांनी त्यांच्या वीरपुत्राचा 12 वा स्मृतीदिन कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व कौटूंबिक पातळीवर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि गर्दी टाळून सामाजिक बांधिलकी दर्शविली.
 
यावेळी परिसरातील ग्रामस्थ व आप्तपरिवार आवर्जून उपस्थित होता.