- ग्रामस्थांनी अथक मेहनतीने घोड्याला काढले बाहेर
- कापोली येथील घटना
दिघी । श्रीवर्धन तालुक्यातील कापोली येथील विहिरीत अडकून पडलेल्या घोड्याची सुटका करण्यात आली आहे. हा घोडा वीस फूट खोल विहिरीमध्ये पडला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रित येत अथक मेहनतीने घोड्याला सुखरुप बाहेर काढले.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. हा ओला चारा खाण्यासाठी काही गुरांचे व अश्वांचे मालक आपली जनावरे दिवसरात्र मोकाट सोडून देतात. असाच एक घोडा भटकत असताना आज (3 जून) पहाटे कापोली येथील प्रशांत पाटील यांच्या घराशेजारील विहिरीत पडला.
ही बाब सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात येता, गावचे पोलीस पाटील रत्नाकर पाटील, विराज पाटील, प्रशांत पाटील, महादेव पाटील, सुरज गाणेकर, प्रकाश गाणेकर, राज पाटील तसेच येथील जगदंबा क्रीडा मंडळाचे सदस्यांनी एकत्रित येत घोड्याची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले.
यामध्ये राज पाटील या तरुणाने पुढाकार घेऊन विहिरीमध्ये उतरुन अतिशय शिताफीचे प्रयत्न केल्याने घोड्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.