- एमटीडीसी-एमएमआरडीएच्या नवीन आराखड्याची अंमलबजावणी
- रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार
कर्जत । पश्चिम घाट प्रतिबंधक क्षेत्र, भीमाशंकर अभयारण्य प्रतिबंधक क्षेत्र परिसर आणि कर्जत तालुक्यातील ग्रीन झोन जमिनीवर आता पर्यावरणपूरक पर्यटन फुलणार आहे. महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानबरोबरच कर्जत तालुक्यातील पर्यटनालाही नवी झळाळी देण्याचा आराखडा महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने तयार केला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून हा विकास करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कर्जतमधील विविध पर्यटनस्थळे विकसित होण्याबरोबरच येथे रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहे.
कर्जत हा ‘ग्रीन झोन’मधील तालुका असून तेथील निसर्गरम्य व प्रदूषणरहित वातावरणामुळे गेल्या काही वर्षांत फार्महाऊसचा तालुका अशी कर्जतची ओळख झाली आहे. येथे जैन मंदिर, कोंडेश्वर मंदिर या धार्मिक प्रेक्षणीय स्थळांबरोबरच कोंढाणा लेणी, कोथळीगड किल्ला, वनविहार लेणी अशी ऐतिहासिक स्थळेही पर्यटकांना आकर्षित करतात. खांडसनजीक शिडीघाट हा भीमाशंकर डोंगरावर जाणारा थरारक ट्रेकींग मार्ग असून, तो ट्रेकर्सना नेहमीच आकर्षित करतो.
अशा पर्यटनस्थळांचा व केंद्रांचा विकास तसेच विस्तार करण्याचा 20 वर्षांसाठीचा कालबद्ध प्रादेशिक आराखडा महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने तयार केला आहे. ही विकासकामे एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. यामध्ये तालुक्यातील वाहतूक, दळणवळण यांचा विस्तार आणि विकासही अंतर्भूत आहे. कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर फार्महाऊस तसेच सेकंड होम असून त्यांना पोषक असलेले अनेक पर्यटनस्नेही उद्योगही येथे उभे राहिलेले आहेत. या विकास आराखड्यानुसार हॉटेल, फार्महाऊस, कृषी पर्यटन केंद्रे तसेच पर्यटनाशी संबंधित व्यक्तींकरिता खास नियमावली करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेश शुल्क, परवाने यातून शासनाला महसूल मिळून तालुक्यातील पर्यटनस्थळे अधिक विकसित होणार आहेत. त्यामुळे रोजगार संधीतही मोठी वाढ होणार आहे.

माथेरानच्या पर्यटन विकासासाठी मागील दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास 36 कोटी रुपयांचा निधी पर्यटन विकासाकरिता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. कर्जत तालुका हा सध्या ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे दिवसेंदिवस येथे कृषी पर्यटनात वाढ होत आहे. मुंबई, नवी मुंबई तसेच ठाण्यासह पुण्यातील पर्यटकांची कर्जत तालुक्याला कायमच पसंती राहिली आहे. मुळातच निसर्गरम्य परिसर व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने कर्जत तालुका अल्पावधीतच फार्महाऊसचा तालुका म्हणून प्रसिद्ध झाला. असे असतानाच या तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने विकास आराखडा मांडून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
या तालुक्याच्या विकासामुळे ग्रामीण भागात विशेषतः सह्याद्रीच्या कुशीत वसलेले खांडस-नांदगाव या निसर्गसंपन्न प्रदूषण विरहित भागाला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. मुंबई-पुणेकरांना येथील परिसर नेहमीच आकर्षित करत असतो. अशात कर्जतचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाल्यास येथील व्यावसायिक पर्यटन केंद्रांना सुगीचे दिवस येणार आहेत. कर्जत तालुक्यात कोणतीही औद्योगिक वसाहत नाही, हे लक्षात घेऊन पर्यटनवाढीच्या माध्यमातून कर्जत तालुका पर्यटन तालुका करण्याचे दृष्टीने एमएमआरडीए आणि एमआयडीसीचे हे महत्वपूर्ण पाऊल समजले जात आहे.