उरण - मोरा रस्त्याला मोठे भगदाड; नगरपरिषदेचे दुर्लक्ष

By Raigad Times    02-Jun-2021
Total Views |
 uran news_1  H
 
उरण(घन:श्याम कडू) । उरण नगरपालिका हद्दीतील उरण मोरा रस्त्यावरील मोरा भवरा येथील भर रस्त्यात डांबरीकरण खचून मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे उरण नगरपालिकेला लक्ष देण्यास सवड नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
 
उरण शहरातील आनंदनगरपासून ते मोरा एनएडीपर्यंतचा भाग उरण नगरपरिषद हद्दीमध्ये येत आहे. येथील रस्तेही नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारले जात आहेत. एमएमआरडीए, नगरपालिकेने फक्त हनुमान कोळीवाडाच्या पेट्रोल पंपपर्यत काँक्रीट रस्त्याचे काम केले आहे. त्यामुळे पुढील रस्त्याचे काम केले नसल्याने भवरा येथील भर रस्त्यात खड्डे पडले आहेत. एक दोन ठिकाणी रस्ता खचला असून मोठे भगदाड पडले आहे. पावसामुळे भगदाडाच्या खालून संपूर्ण रस्ता खचला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 
रस्ता काँक्रीटचे काम गेली 3 ते 4 वर्षे सुरू असूनही आजतागायत पूर्णत्वास गेलेले नाही. याचे सोयरेसुतक एमएमआरडीए व नगरपालिकेला असल्याचे दिसत नाही. तसेच इतर अनेक उपक्रम हाती घेऊन त्याचे उदघाटन थाटामाटात केले आहे. पण बहुतांश कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. याबाबत सत्ताधारी, विरोधक यांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत आहे.
 
सदरच्या रस्त्यावरून उरण - मोरा मुंबईकडे जाणार्‍या प्रवासी वर्गाची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच एनएडी व ग्रँडवेल कंपनीकडे जाणारी वाहतूक मोठया प्रमाणात असते. त्यामुळे एखादा मोठा अपघातही होण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी याची पाहणी करून हे रस्त्याला पडलेले भगदाड तात्काळ बुजवून तसेच इतर प्रलंबित कामे कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

-----------------------------------------------------
 
या रस्त्याचे मोरापपर्यंत काँक्रीटीकरण करायचे आहे. मंजुरी झालेली असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया होणे बाकी आहे. काही ठिकाणी रस्ता खचला असेल तर त्याची पाहणी करून त्याची डागडुजी तात्काळ करण्यात येईल.
- संतोष माळी, मुख्याधिकारी
उरण नगरपरिषद