पेण : कोरोना रुग्णांसाठी कल्पेश ठाकूर ठरताहेत ‘देवदूत’

By Raigad Times    14-Jun-2021
Total Views |
Free Ambulance Service Pe
 
'साई सहारा प्रतिष्ठान'च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून दोन महिन्यांत 200 रुग्णांना विनामूल्य सेवा
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांना मागील सोळा वर्षांपासून विनामूल्य सेवा देणारा पेण येथील कल्पेश ठाकूर आता कोरोना रुग्णांसाठीही देवदूत ठरत आहे. त्यांच्या ‘साई सहारा प्रतिष्ठान’च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून दोन महिन्यांत 200 रुग्णांना विनामूल्य सेवा देण्यात आली आहे.
 
कोरोना महामारीने मागील वर्षीपासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आज या सांसर्गिक रोगाने नाती दुरावली, गाव दुरावले, असे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. आपले-आपले म्हणणारेदेखील या कोरोनाच्या भितीने लांब गेले. कोरोनाग्रस्त रुग्णाकडे सगळे पाठ फिरवत असतानाच या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी कल्पेश ठाकूर पुढे आले.
 
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतलेल्या कल्पेश ठाकूर यांनी कोरोनाच्या लढाईतदेखील आपले विनामूल्य सेवेचे व्रत कायम ठेवले आहे. त्यांच्या साई सहारा प्रतिष्ठान पेणच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण एप्रिल महिन्यात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.
 
त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत 200 हून अधिक कोरोना बाधित रुग्णांना पेण ते अलिबाग, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, कर्जत येथे कोणताही मोबदला न घेता रुग्णालयांत विनामूल्य सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे. आपला हॉटेल व्यवसाय सांभाळत असतानाच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कल्पेश ठाकूर यांनी नेहमीच धाव घेतली आहे.
 
गाडीत लागणार डिझेल असो किंवा चालकाचा पगार, गाडीचे छोटे-मोठे काम असो कल्पेश हे सर्व स्वतःच्या खर्चाने करत आहेत. एखाद वेळी रुग्णवाहिकेवर चालक नसला तरी स्वतः चालकाची भूमिका निभावून रुग्णाला सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याचेदेखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
दरम्यान, अपघातग्रस्त व कोरोनाग्रस्ताला मदत लागल्यास 9225714555 या मोबाईल नंबरवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन कल्पेश ठाकूर यांनी केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील माझा हॉटेल व्यवसाय सांभाळत असताना, अनेक अपघात होताना पाहिले. मात्र अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे बघूनच मी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलो. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईहुन कोकणात व कोकणातून परराज्यात पायी चालत जाणार्‍या वाटसरुंना अन्नदान केले. त्यावेळी कोरोना रुग्णांपासून दूर ळणारी लोकंही पाहिली. कोरोना रुग्णांची होणारी परवड बघून या रुग्णांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका घेतली. कोरोना रुग्ण व अपघातग्रस्तांकडून कोणताही मोबदला न घेता तीन रुग्णवाहिकेतून ही मोफत सेवा सुरु आहे.
- कल्पेश ठाकूर, समाजसेवक, पेण