नेरळचे सरपंच रावजी शिंगवा यांचे निधन

By Raigad Times    14-Jun-2021
Total Views |
Neral Sarpanch Passed awa
 
कर्जत । नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून निवडून येऊन कारभार स्वीकारणारे रावजी शिंगवा यांचे आज दुर्धर आजारावर उपचार घेत असताना आज (14 जून) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आदिवासी समाजातील आक्रमक आणि अभ्यासू समजले नेते जाणारे शिंगवा हे थेट सरपंच म्हणून सत्तेवर बसल्यानंतर त्यांनी नेरळ ग्रामपंचायतची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणली होती.
 
आदिवासी समाजातील बुजूर्ग कार्यकर्ते स्व. वामन ठोंबरे यांचे शिष्य म्हणून सामाजिक कार्य करता करता राजकारणात ओढले गेलेले रावजी शिंगवा यांनी आपल्या अभ्यासू आणि जनतेचे प्रश्न समजून घेण्याची असलेली कुवत लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून भरीव काम केले होते. त्यानंतर नेरळ पंचायत समिती गणातून कर्जत पंचायत समितीची निवडणूक लढविली होती.
आदिवासी समाज आणि नेरळ परिसरात शिवसेनेे काम करणारे रावजी शिंगवा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या थेट सरपंचपदाची निवडणूक जिंकली होती. डिसेंबर 2019 मध्ये सरपंचपदाचा कार्यभार हाती घेत रावजी शिंगवा यांनी नेरळ ग्रामपंचायतीला प्रथम आर्थिक संकटातून बाहेर काढले.
 
त्यानंतर आलेल्या कोरोना संसर्ग काळात नेरळ गावातील स्वच्छतेवर भर देत नेरळमध्ये शहरी भाग असतानासुद्धा कोरोनाला रोखण्यात नेरळ ग्रामपंचायतीला यश आले होते. कोरोना काळात सतत जनतेत राहून काम करणारे सरपंच म्हणून शिंगवा यांनी आपली ओळख निर्माण केली होती. काही महिन्यांपूर्वी काविळ झाल्याने स्वतः काहीसे खचलेले रावजी शिंगवा यांना त्याच काळात आणखी एका दुर्धर आजाराने लक्ष्य केले.
 
त्यात नवी मुंबईमधील खासगी रुग्णालयात ते मागील दोन महिने उपचार घेत होते.आजारी असल्याने रावजी शिंगवा यांनी नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार थांबू नये, यासाठी रजेवर जाण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानंतर कर्जत पंचायत समितीने उपसरपंच शंकर घोडविदे यांच्याकडे नेरळ ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदाचा कारभार दिला होता.
 
आज सकाळी मुंबई येथील उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने 42 वर्षीय रावजी शिंगवा यांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहाचे दफन नेरळ कोंबलवाडी येथे आदिवासी समाजाच्या रुढीप्रमाणे करण्यात आले. रावजी शिंगवा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.