मुंबई-गोवा महामार्गाची खा.सुनील तटकरेंकडून पाहणी

By Raigad Times    14-Jun-2021
Total Views |
Mumbai-goa national highw
 
संबंधीत ठेकेदार व अधिकारीवर्गाला काम मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना
 
रोहा । दरवर्षी येतो पावसाळा, दरवर्षी पडतात खड्डे आणि दरवर्षी होते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. चौपदरीकरणाचे रखडलेले काम आणि खड्डे पडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी ठेकेदार आणि अधिकार्‍यांना दिल्या.
 
मुंबई-गोवा महामार्ग हा कायम रहदारीचा मार्ग असून या मार्गावरुन दररोज हजारो वाहने मार्गक्रमण करीत असतात. सद्यस्थितीत या मार्गाची अत्यंत बिकट अवस्था आहे. वडखळच्या पुढे इंदापूरपर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात घडून अनेकांना जीवदेखील गमवावे लागले आहेत.

Mumbai-goa national highw 
 
आज (14 जून) खा. सुनील तटकरे यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, राष्ट्रवादीच्या रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामार्गावरील असलेले छोटे पूल, पुई येथील मोरी व कुंडलिका पूल येथे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 
कोलाड ते खांब परिसरात बहुतेक कामे अर्धवट आहेत. या पार्श्वभूमीवर खा. सुनील तटकरे यांनी कोलाड व खांब येथे येऊन या मार्गाची पाहणी केली. तसेच संबंधीत ठेकेदार व अधिकार्‍यांना लवकरात लवकर काम मार्गी लावून खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.