रायगडच्या किनार्‍यावर पर्यटकांची होतेय गर्दी; रायगडकर अस्वस्थ

By Raigad Times    14-Jun-2021
Total Views |
 Raigad_Tourism_1 &nb
 
अलिबाग । राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी रायगडकर मात्र कोरोनामुळे अजूनही घरात आहेत. कोरोना पॉझिटीव्हीटी रेट कमी होत नसल्याने हैराण आहेत. दुसरीकडे मुंबई, पुण्यातील पर्यटकांची पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. ‘आम्ही घरात आणि पर्यटक अंगणात’ अशी अवस्था रायगडकरांची झाली आहे.
 
रायगडच्या किनार्‍यांवर फिरण्यासाठी यायला आता कुठल्या ऋतूची गरज राहिली नाही. गाडी काढली की सहज अलिबागपासून श्रीवर्धनपर्यंत कुठेही जाणे मुंबई, पुणेकरांचे आवडीचे काम. त्यामुळे शनिवार, रविवार रायगडच्या किनार्‍यावर मोठी गर्दी असायची. मात्र कोरोना आल्यापासून या गर्दीला ओहोटी लागून पर्यटनाला ब्रेकच लागला होता. 
 
कोरोनामुळे सातत्याने निर्बंध लागू केल्यामुळे नागरिकांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सरकारने निर्बंध लागू केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने निर्बंध शिथिल केले जात असून, लोक बाहेर पडताना दिसत आहे. पर्यटनस्थळ असलेल्या अलिबाग, मुरुडकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.
 
कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याने राज्य सरकारने रुग्णसंख्या आणि पॉझिटीव्हीटी रेट कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबई-पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. ई-पासची अट रद्द झाली. अगदी पावसाच्या तोंडावर हे झाल्यामुळे इतके दिवस घरात असलेल्या नागरिकांनी वर्षा पर्यटनासाठी रायगडकडे कूच केली आहे.
 
खरे तर रायगड जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट अजूनही जास्त आहे. त्यामुळे इथले नियम शिथील झालेले नाहीत. त्यामुळे रायगडकर अजूनही घरात आहेत. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोनदेखील घोषित करण्यात आले आहेत. व्यवसाय धंदे बंद आहेत. मात्र ज्या भागात अनलॉक झाले आहे, तेथील नागरिक माहिती न घेताच फिरण्यासाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माथेरानकडे धाव घेताना दिसत आहेत.
 
जिल्ह्याबाहेरच्या पासिंगची वाहने पाहून रायगडकर चरफडत आहेत. कोरोना पॉझिटीव्हीटी रेट कमी व्हावा, यासाठी आम्ही घरात बसलो तरी येणारे पर्यटक काय घेऊन येतील, अशी अनामिक भीती त्यांना वाटत आहे. त्यांची वाहने पोलीस सोडतात कशी? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. मात्र राज्यात जाण्यासाठी आता ई-पासची आवश्यकता नसल्यामुळे येणार्‍या पर्यटकांसमोर पोलीसही हतबल आहेत.