कर्जत : बँक ऑफ बडोदाच्या कळंब शाखेतील कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार

By Raigad Times    14-Jun-2021
Total Views |
Karjat_MNS_1  H
 
मनसे आक्रमक; बँक व्यवस्थापनास निवेदन
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील कळंब येथे असलेल्या बँक ऑफ बडोदा या शाखेमधील कर्मचारीवर्गाची मनमानी वाढत आहे. ग्राहकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कर्जत मनसेच्यावतीने बँक ग्राहकांची होणारी गैरसोय थांबविण्याबाबत शाखेच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.
 
कर्जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले कळंब या आदिवासीबहुल भागात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून कळंब परिसर ओळखला जात असून बहुतांशी लोक मराठी भाषिक आहेत. याशिवाय आदिवासी खातेदारही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बँक कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
बँकेतील कर्मचारीवर्गाकडून मराठी भाषेचा वापर न होणे, काही कर्मचार्‍यांना मराठी येत असूनही जाणूनबुजून आदिवासी खातेदारांशी हिंदी भाषेतून बोलणे, खातेसंबंधीत माहिती देताना कामासाठी नेटवर्कची समस्या सांगून सतत फेर्‍या मारायला लावणे, खातेदारांना रांगेत तिष्ठत ठेऊन भ्रमणध्वनीवर गप्पा मारणे, तसेच ग्राहकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक या अशा प्रकारच्या तक्रारी खातेदारांकडून वाढू लागल्या आहेत.
 
बँकेच्या या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली असून त्यासंदर्भात बँक व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले. यावेळी कर्जतचे माजी स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे, माजी उपाध्यक्ष महेंद्र निगुडकर, तालुका उपाध्यक्ष अकबर देशमुख, यशवंत भवारे, कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण, सचिव चिन्मय बडेकर, आदींसह दहिवली विभाग अध्यक्ष मंगेश गोमारे, कळंब विभाग अध्यक्ष संजय पाटील, मनविसे तालुका उपाध्यक्ष सतिश कालेकर, सहसचिव प्रवीण राणे, ओलमण ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक पाटील, सागर कांबरी, नवनिष कांबरी, जितेंद्र राणे, भगवान माळी, निलराज विचारे, संदेश काळभोर आदी उपस्थित होते.