चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर नाहीत, हे आहेत पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड!

By Raigad Times    13-Jun-2021
Total Views |
Navi Mumbai Airport_Jagdi
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा
 
पनवेल । छायाचित्र पाहून तुम्हाला हे महोदय कुठल्या तरी चित्रपटाचे ‘अ‍ॅक्शन डायरेक्टर’ वाटू शकतात; पण चेहरा ओळखीचा वाटेल. बारकाईने बघितले की लक्षात येईल. हे आहेत, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड. लाठीकाठीचा सराव करत आहेत. 24 जूनला स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटना सिडकोला घेराव घालणार आहेत. यावेळी वेळ पडल्यास स्वरक्षणासाठीची तयारी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बां. पाटील यांचेच नाव देण्यासाठी आंदोलक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 10 जूनच्या यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर येत्या 24 जूनला स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटना सिडकोला घेराव घालणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची सर्वत्र एकच चर्चा दिसून येत आहे.
 
या व्हिडीओत पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड लाठीकाठीचा साहसी खेळ करत असल्याचे दिसून येत आहे. ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम!’ या गाण्याच्या साथीने जगदीश गायकवाड अ‍ॅक्शन मोडमध्ये लाठीकाठीचा सराव करताना व्हिडीओत दिसून येत आहे.
-----------------------------
व्हायरल झालेला व्हिडीओ :- https://fb.watch/65TTFiBWSg/
 -----------------------------
या व्हिडीओबद्दल जगदीश गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, येत्या 24 तारखेला सिडकोला घेराव घालण्यासाठी आंदोलनाचा सराव सुरु असल्याचे ते म्हणाले आहेत. खरंतर सिडकोवर आम्हाला लाठी मोर्चाच घेऊन जायचा आहे, त्याची ही तयारी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले असून सगळ्या आगरी, कोळी, कराडी तरुणांनी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
दि.बां. पाटील यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शांततेत व सनदशील मार्गाने आंदोलन केले. मात्र 24 जूनला होणार्‍या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल. तसेच 24 तारखेच्या आंदोलनानंतर आम्ही थांबणार नाही. त्यानंतर आम्ही रास्ता रोको करु. तसेच अनेक आंदोलने करु, असा इशाराही जगदीश गायकवाड यांनी दिला.
 
आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आम्हाला अडवू शकतात. पोलीस सर्वांचे रक्षणकर्तेच आहेत; परंतु एखादी घटना घडल्यास शेतकर्‍यांना स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. त्यामुळे बचावासाठी या गोष्टी करणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
 
जगदीश गायकवाड पुढे म्हणाले की, लाठीकाठी हा आमच्या आज्यापंज्यापासून चालत आलेला साहसी खेळ असून आता आम्ही तो आमच्या आगरी-कोळी समाजाच्या रक्षणासाठी वापरणार आहोत. यापूर्वीही आदिवासी समाजाला वीज मिळावी म्हणून लाठी मोर्चा काढला होता. परंतु त्यावेळी लाठी चालविण्याची वेळ आली नव्हती.
 
आतापर्यंत आम्ही शिस्तीने आंदोलन केले; पण यापुढे जर आमच्यावर हुकूमशाही केली गेली तर वेळप्रसंगी एकाचे दोन हात झाले तरी बेहत्तर, असा इशारा त्यांनी दिला आहे.