53 हजार घरांमध्ये पुस्तके भेट देणार; नवी मुंबई मनसेचा संकल्प

By Raigad Times    13-Jun-2021
Total Views |
Navi Mumbai MNS_1 &n
 
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानार्पण सोहळा
 
नवी मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त 53 हजार घरांमध्ये संपूर्ण वर्षभर मोफत पुस्तके भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. यासाठी 100 मराठी पुस्तकांची यादी प्रसिद्ध करत, त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन नवी मुंबई मनसेने केले आहे.
 
सदरच्या पुस्तकांच्या यादीमध्ये सुप्रसिद्ध लेखक, कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व.पु. काळे, ना.धों. महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी, लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे.
 
यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व.पु. काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं, सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांची यादी आहे, असे नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
 
पुस्तक वाचल्याने प्रगल्भ आणि सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होत. म्हणूनच नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती रुजावी, याकरिता नवी मुंबई मनसेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मत गजानन काळे यांनी व्यक्त केले. कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असताना तसेच या सर्व प्रसंगांमधून नवी मुंबईतील नागरिक जात असताना लॉक डाऊन व कोविडच्या संकटामुळे नागरिकांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. अशा वेळी पुस्तक त्यांना या परिस्थितीमधून बाहेर काढेल, असा ठाम विश्वास गजानन काळे यांना आहे.
 
नवी मुंबई मनसेने या अभियानाची सुरुवात केल्यानंतर काही तासांतच 1500 पुस्तकांची नोंदणी नवी मुंबईकरांनी केलेली आहे. तसेच सदर पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने 9090505067 व 8108181007 हे दोन क्रमांक प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप, क्यू आर कोड, तसेच गुगल लिंकच्या माध्यमातून आपली माहिती देऊन आपले आवडते पुस्तक नागरिक नोंदवू शकतात.
 
नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या वाचन चळवळीत सहभाग नोंदवून वाचन संस्कृती वृद्धांगित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.