खारघर परिसरातील धबधब्यांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी

By Raigad Times    12-Jun-2021
Total Views |
Pandavkada Waterfall_Khar
 
...अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल; पोलिसांचा इशारा
पनवेल । खारघर परिसरातील धबधब्यांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी झुगारुन धबधब्यांच्या परिसरात प्रवेश केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिला आहे.
 
खारघर परिसराला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. वनराईने नटलेला डोंगराळ भाग व नैसर्गिक पर्यावरण यामुळे खारघरच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. विशेषतः पावसाळ्यात खारघर परिसरात धबधबे ओसंडून वाहत असल्याने दरवर्षी निसर्गप्रेमी, पर्यटक पर्यावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. खारघरमधील डोंगराळ भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाण्याचे झरे निर्माण होतात.
 
खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज, घामोळे गाव, ओवे कॅम्प डोंगर, धरण परिसर, तळोजा कारागृहासमोरील डोंगर व तळोजासमोरील तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान-मोठे धबधबे दरवर्षी निर्माण होतात. त्यामुळे या परिसरात पावसाळी सहलीचे स्वरुप प्राप्त होते. डोंगरावरुन वाहणार्‍या पाण्यामुळे पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी व ओवे कॅम्प धरण व आजूबाजूच्या परिसरात मोठमोठे धबधबे तयार होतात. त्यामुळे पर्यावरणाचा आस्वाद घेण्यासाठी दर शनिवारी व रविवारी तसेच इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक व निसर्गप्रेमी धबधब्याच्या भिजण्यासाठी व पोहण्यासाठी याठिकाणी येत असतात.

Pandavkada Waterfall_Khar 
 
काही वेळेला धबधब्यावरून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहासोबतच डोंगरावरील लहान-मोठे दगड घरंगळत येऊन धबधब्याखाली बसलेल्या तसेच पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून त्यांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. तसेच धबधब्यामुळे तयार झालेल्या पाण्याच्या डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याचे प्रकारही यापूर्वी अनेकदा घडले आहेत.
 
अशीच एक घटना गतवर्षीही घडली होती. 4 तरुणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या होत्या. अशा घटना घडू नये, यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी पनवेल विभाग, नवी मुंबई पोलीस यांच्याकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये 7 जून ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत सदर प्रतिबंधित ठिकाणी जाण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
 
अतिउत्साही पर्यटक पांडवकडा धबधब्यावर येऊन मद्यपान करून धिंगाणा घालत असतात. त्यामुळे लहान मुलांना व महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांमुळेच धबधब्यावर बंदी घालण्यात येते. यावर्षीही प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली आहे. दरम्यान, या बंदीमुळे पर्यावरणप्रेमी तसेच पर्यटकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------------------------
खारघर परिसरातील सृष्टीसौंदर्यामुळे पर्यटकांना पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी येण्याचा मोह आवरत नाही. परंतु सदरचा परिसर अत्यंत दुर्गम व धोकादायक असल्याने याठिकाणी यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. याप्रकारच्या वारंवार दुर्घटना घडू नये हाच यामागील मुख्य हेतू आहे. सदर प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करताना कोणी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्याकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- शत्रुघ्न माळी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे