तळा : कुडा बौध्द लेणींचा होणार पर्यटन विकास

12 Jun 2021 22:46:48
Kuda Caves_Tala Taluka_Ra 
 
विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता
अलिबाग । तळा तालुक्यातील कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. या प्राचीन बौध्द लेणींचा पर्यटनात समावेश करुन येथील विकास करण्यात येणार आहे. यातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
 
रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द लेणीचा उल्लेख केला जातो. जगाच्या इतिहासामध्ये कुडे प्राचीन बौद्ध लेण्यांची नोंद पहावयास मिळते. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लेण्यांची निर्मिती केली. येथे 26 कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे.
 
या लेण्यांची नोंद इ.स. 1848 मध्ये सापडली असून या लेण्या इ.स. पूर्व सहाव्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे या ठिकाणी आढळतात. भिक्षूंना राहण्यासाठी त्या काळात व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते. भगवान गौतम बुध्दांच्या कोरीव प्रतिमादेखील यामध्ये आहेत. गेली अनेक वर्षे नागरिकांकडून लेणीचा विकास करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.

Kuda Caves_Tala Taluka_Ra 
 
त्याची दखल घेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यांच्यासह कुडा बौध्द लेणी येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लेणीचा विकास आणि संवर्धन पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून अधिक चांगल्या पध्दतीने कसे करता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
 
या चर्चेत तळा पंचायत समिती सभापती देविका लासे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, जिल्हा परिषद सदस्य बबन चाचले, नगरसेवक चंद्रकांत रोडे, उपसभापती गणेश वाघमारे, मोदाडचे सरपंच तानाजी कालप, माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार कनशेट्टी, गटविकास अधिकारी यादव, पोलीस निरीक्षक गैंगजे यांनीही सहभाग नोंदवला होता.
 
तळा तालुक्यातील कुडा लेणी या पर्यटनस्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.
Powered By Sangraha 9.0