सिप्ला कंपनीकडून पनवेल महानगरपालिकेला अँटीजन, आरटीपीसीआर टेस्ट किट

By Raigad Times    12-Jun-2021
Total Views |
Cipla Foundation_Panvel M
 
पनवेल । रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेस 5 हजार अँटीजन आणि 5 हजार आरटीपीसीआर टेस्ट किट देण्यात आल्या आहेत.
 
यावेळी सिप्ला कंपनीचे साईट प्रमुख विजय थानगे, सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. पुनम जाधव, सिप्ला फाऊंडेशन सीएसआर मॅनेजर सुनिल मकरे उपस्थित होते.
 
कोरोना महामारीच्या या काळात नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे का नाही? याचे निदान करण्यासाठी अँटीजन आणि आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे असते. महानगरपालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने एके दिवशी साधारणत: दोन हजार चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्यांच्या किटची गरज भासत असते. सिप्ला कंपनीच्यावतीने देण्यात आलेले किट महापालिकेस कोरोना चाचण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहेत.
 
पुढील काळात सिप्ला कंपनीच्यावतीने महापालिकेस विविध प्रकारची वैद्यकीय मदत करण्याचे आश्वासन यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिले.
-----------------------------------------------------------
सिप्ला कंपनीच्या सीएसआर फंडातून महापालिकेस जी मदत मिळाली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. कोरोनाचे अचूक निदान करण्यासाठी सदर मदत महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी अंत्यत महत्वाची आहे.
- सुधाकर देशमुख,
आयुक्त, पनवेल महानगरपालिका