बोर्लीपंचतनच्या चिंचबादेवी मंदिर रस्त्यासाठी 20 लाखांचा निधी मंजूर

By Raigad Times    12-Jun-2021
Total Views |
Chinchabadevi Temple_Borl
 
बोर्लीपंचतन । श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावची ग्रामदेवता चिंचबादेवी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यासाठी ग्रामविकास निधीतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र खा.सुनील तटकरे यांनी आज (12 जून) सुतारवाडी येथे चिंचबादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुजित पाटील यांना सुपूर्द केला.
 
बोर्लीपंचतन गावची सुप्रसिद्ध ग्रामदेवता चिंचबादेवीचे मंदिर गावाच्या वेशीवर असल्याने या मंदिराकडे गावातून तसेच मुख्य बाजारपेठेतून जाणार्‍या रस्त्याची गेली अनेक वर्षे दूरवस्था झाली होती. सदर रस्ता म्हणजे भक्तांच्या भावनेचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याचे डांबरीकरण नव्याने होण्याची मागणी चिंचबादेवी देवस्थान समिती तसेच ग्रामस्थांकडून केली जात होती.
 
यावर खा.सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास निधीतून सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत 20 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र आज खा.तटकरे यांनी चिंचबादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुजित पाटील, माजी अध्यक्ष गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
 
यावेही महमद मेमन, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपसरपंच संतोष पयेर, माजी उपसरपंच मन्सूर गिरे, प्रकाश तोंडलेकर, देवस्थान समिती उपाध्यक्ष विजय मोरे, माजी उपाध्यक्ष उत्तम दिवेकर, सचिव विक्रांत शिरकर, सहखजिनदार परशुराम दिवेकर, गणपती देवस्थान समिती अध्यक्ष सुशील पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष गायकर उपस्थित होते.