रायगड : पॉस्को कंपनीचे भंगार घेऊन जाणार्‍या ट्रेलरची तोडफोड; चालकालाही लुटले!

11 Jun 2021 21:19:36
broken glass_1  
file Image 
  • कोलाड-भिरा रस्त्यावरील घटना
  • चौघांविरोधात गुन्हा दाखल
रोहा । पोस्को कंपनीच्या भंगाराचा वाद अजून सुरुच आहे. गुरुवारी (10 जून) पोस्को कंपनीचे भंगार घेऊन जाणार्‍या ट्रेलरची कोलाड-भिरा रस्त्यावर तोडफोड करुन, वाहनचालकाच्या खिशातील पैसे लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी 4 जणांविरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कोलाड-भिरा रस्त्यावर रेल्वे ट्रॅकजवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली. फिर्यादी वाहनचालक (रा.तासगाव ता.माणगाव) त्याच्या ताब्यातील ट्रेलरमध्ये पोस्को कंपनी विळे भागाड येथून स्क्रॅप भंगाराचा माल भरुन भिरा कोलाड रस्त्याने जात होता.
 
कोलाड-भिरा रस्त्यावरील रेल्वे ट्रॅकजवळ मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी अचानक ट्रेलरसमोर मोटारसायकल लावून ट्रेलर थांबवला. तसेच ट्रेलरचालकाला गाडीमधून खाली उतरवून त्यांच्याकडील लाकडी दांडक्याने ट्रेलरची तोडफोड केली. तसेच ‘जोपर्यंत मॅटर सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत असेच चालू राहणार’ असे म्हणून ट्रेलरचालकाच्या खिशामधील 2 हजार रुपये रोख रक्कम जबरीने चोरी करुन ते मोटारसायकलवरुन पसार झाले.
 
दरम्यान, या घटनेप्रकरणी ट्रेलरचालकाच्या फिर्यादीवरुन कोलाड पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघेही फरार असून, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0