नैसर्गिक आपत्तींमुळे मच्छिमार आर्थिक संकटात

By Raigad Times    11-Jun-2021
Total Views |
 web fishman_1  
 
श्रीवर्धन । सध्या पावसाळी मासेमारी बंदी आहे. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोना, त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, ताउक्ते चक्रीवादळ, खराब वातावरण या एकामागोमाग आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारीचा हंगाम वाया गेल्याने, मच्छिमार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
 
सरकारी उदासिनता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार व्यवसाय धोक्यात आला असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. गतवर्षीचे निसर्ग चक्रीवादळ, ताउक्ते चक्रीवादळ, अवकाळी पावसाच्या नुकसानीतून बाहेर निघत नाही, तोवर मच्छिमारांना कोरोनामुळे पुन्हा झालेल्या लॉकडाऊनचा फटका बसला. यामुळे मच्छिमारांवर आभाळ कोसळले आहे.
 
आता 1 जूनपासून सागरी मच्छिमारीला पावसाळी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पावसाळी मासेमारीसाठी यांत्रिक छोट्या मोठ्या नौकांना लागू करण्यात आली आहे. मात्र पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगरयांत्रिक नौकांना ही बंदी लागू होत नाही. तसेच राज्याच्या सागरी जलक्षेत्रात (सागरी किना-यापासून 12 सागरी मैलापर्यंत) खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणा-या नौकांना केंद्र शासनाने खोल समुद्रातील मासेमारीबाबत, धोरण, मार्गदर्शक, सूचना, आदेश लागू राहत असतात.
 
राज्याच्या सागरी मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी ह्या कालावधीत मासेमारी करतांना आढळ्यास सदर मासेमारी नौकांना महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 कलम 14 अन्वये अशा नौका पकडल्यास नौकेवरील पकडलेली मासळी जप्त करण्यात येते व कलम 17 मधील तरतुदीन्वये मच्छिमारांवर कारवाई केली जाते.