माणगाव : लोणेरेजवळ ट्रकच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
road-accident_1 &nbs
 
ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल
 
माणगाव । मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 10 किमी अंतरावर असणार्‍या लोणेरे गावच्या हद्दीत दीपक सर्व्हिस सेंटरसमोर भरधाव जाणार्‍या ट्रकने विरुद्ध दिशेला जाऊन समोरून स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (9 जून) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.
 
ट्रकचालक मिखिलेश चंद्रिका चौहान (वय-29, रा.सगरी, जि.अझमगड, राज्य उत्तर प्रदेश) याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्र.जि.जे. 15 ए.टी. 2099 हा लोणेरेकडून महाडकडे घेऊन जात होता. माणगाव तालुक्यातील लोणेरे गावच्या हद्दीत दीपक सर्व्हिस सेंटरसमोर त्याने समोरील जाणार्‍या वाहनास ओव्हरटेक करून विरुद्ध बाजूला जात महाडकडून लोणेरेकडे जाणाऱ्या स्कुटी (क्र.एम.एच.06 सी.सी 9605) ला धडक दिली. यात स्कुटीचालक शुभम धोंडीराम वाघमारे (वय 22, रा.पहेल ता.माणगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी पनवेल येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
 
याप्रकरणी ट्रकचालक मिखिलेश चंद्रिका चौहान याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. नावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर.डी. ढोबळे हे करीत आहेत.