पाली-भूतीवली धरणातील मासे मारण्यासाठी विषप्रयोग

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
Pali Bhutivali Dam_karjat
 
धरणाच्या तीरावर मृत माशांचा खच
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणातील मासे मारण्यासाठी विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे धरण तीरावर मृत माशांचा खच पडला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
 
गतवर्षी 2020 मध्ये पाऊस कमी झाल्याने पाली भूतीवली धरण ओव्हर फ्लो झाले नव्हते. परिणामी धरणात सोडण्यात आलेले मासे मोठे झाले असून काही माशांचा आकार 20 किलोहुन अधिक मोठा झाला असल्याचे जाणकार सांगतात. धरणातील हजारो मासे मारुन त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने पाण्यात विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार केला गेला आहे.
 
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कर्जत तालुक्यात पाली भूतीवली येथे लघु पाटबंधारे योजनेतून बांधण्यात आलेल्या धरणात हा प्रकार घडला आहे. सदर या जलाशयात कोणालाही उतरण्यास, मासेमारी तसेच परिसरात प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असतानाही अशा प्रकारची कामे धरण परिसरात सर्रासपणे होत आहे.

Pali Bhutivali Dam_karjat 
 
याच धरणातील जलाशयात छुप्या पद्धतीने मासेमारी होत होती. परंतु मासे मारण्यासाठी विषारी पदार्थाचा वापर येथे केला जात असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धरण परिसरात फिरायला गेलेले शिवसेनेचे कर्जत उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे यांना धरणाच्या किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात मासे तरंगत असल्याचे दिसल्याने ही बाब समोर आली आहे.
 
अंकुश दाभणे यांना धरणाच्या किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात मासे तरंगत असताना दिसून आले होते, हे मासे मारण्यासाठी विषारी पदार्थ वापरण्यात आले असल्याने संबंधित प्रकार करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली आहे.
 
दुसरीकडे धरण परिसरातील अनेक गावांना पिण्याचा पाण्याच्या नळपाणी योजना या धरणातील पाण्यावर आहेत. त्या पाणी योजना विषारी पाण्यामुळे अडचणीत आल्या आहेत. परंतु संबंधित विभाग या घटनेचा किती गांभीर्याने विचार करते, हेदेखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.