पनवेल : छताचे काम करणार्‍या कामगाराचा खाली पडून मृत्यू

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
roof worker falls down_pa
 
कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल
पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील दिव्यश्री पॅकेजिंग सप्लायर्स कंपनीतील छताच्या डागडुजीचे काम करताना सिमेंटचा पत्रा तुटल्यामुळे 15 फूट उंचावरुन खाली पडून मंजिल सैकिया (27) या कामगाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या कामगाराला दिव्यश्री पॅकेजिंग सप्लायर्स या कंपनीच्या मॅनेजरने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची साधने पुरविली नसल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी सदर घटनेला कंपनीचा मॅनेजर शांताराम संभाजी पवळे याला जबाबदार धरुन त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
सदर घटनेतील मृत मंजिल सैकिया तळोजा येथील घोटचाळ येथे पत्नीसह राहत होता. मंजिल याला तळोजा एमआयडीसीतील दिव्यश्री पॅकेजिंग सप्लायर्स या कंपनीतील छताच्या डागडुजीचे काम करण्यासाठी कंपनीच्या मॅनेजरने बोलावले होते. त्यानुसार मंजिल आणि त्याचे इतर तीन साथीदार दिव्याश्री कंपनीच्या छताचा डागडुजी करण्यासाठी चढले होते.
 
याचवेळी कंपनीच्या छतावरील सिमेंटचा पत्रा तुटल्याने त्यावर उभा असलेला मंजिल सैकिया 15 फूट उंचावरुन खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर घटनेनंतर तळोजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला होता.
 
तपासादरम्यान दिव्यश्री पॅकेजिंग सप्लायर्स कंपनीच्या मॅनेजरने छतावर काम करण्यासाठी चढलेल्या कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा आणि साधने दिली नसल्याचे आढळून आले. त्यामुळेच सदरची दुर्घटना घडल्याचे तपासात आढळून आले आहे.
 
त्यामुळे तळोजा पोलिसांनी मंजिल सैकिया याच्या मृत्यूला कंपनीचा मॅनेजर शांताराम पवळे याला जबाबदार धरुन त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर प्रकरणात स्वत: पोलीस उपनिरीक्षक कृष्णा वुटे यांनी फिर्याद दिली आहे.