पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे आणि त्यासाठी सरकारचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे याकरिता रायगड ते मुंबई अशी भव्य मानवी साखळी आंदोलन आज करण्यात आले.
’हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, वाया जाऊ द्यायचे नसते’ आणि ’संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही’ हे प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे वचन घेऊन हे आंदोलन झाले. दिबांच्या नावासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत अशीच भूमिका या आंदोलनात पहायला मिळाली. पनवेल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते सीबीडी बेलापूर अशी तब्बल 12 किमी अंतराची मानवी साखळी बघताना हि दिबांसाठी मानवतेची साखळी असल्याचे अधोरेखित झाले. रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात एकूण जवळपास 200 किमी अंतराची मानवी साखळी उभारण्यात आली होती. यामध्ये जवळपास 40 हजारहुन जास्त जणांनी सहभाग घेऊन मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली.
या मानवी साखळीत म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जे. डी. तांडेल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत, माजी उपमहापौर चारुशिला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शेकडो संघटना, वारकरी संप्रदाय, कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षांचे कार्यकर्ते, हजारो नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी ’विमानतळाला दिबासाहेबांचेच हवे नाव’ अशी गर्जना करताना दिबासाहेब झिंदाबाद, दिबासाहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून हे आंदोलन झाले. हवामान खात्याने अतिवृष्टीचा ईशारा दिला होता. त्या अनुषंगाने तसे पडसादही होते मात्र निसर्गसृष्टीला सुद्धा दिबासाहेबांचेच नाव मान्य असल्याने आंदोलकांना पावसाची बाधा पोहचु नये यासाठी वरुणराजाने विश्रांती घेत आंदोलनाला साथ दिली. मानवी साखळीत दिबांचे चित्र असलेले मास्क आणि रक्तररंजित झेंडे, बॅनर, हॅन्ड होर्डिंग्ज लक्षणीय होते. एकूणच या आंदोलनातून 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्याची पूर्वतयारीही दिसत होती आणि जो पर्यंत दिबांचे नाव नाही तो पर्यंत संघर्ष कायम असल्याचा निश्चय स्पष्ट दिसून आला.