माणगाव : विळे येथील तलाठ्याला लाच घेताना अटक; मंडळ अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
mangoan NEWS_1  
 
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अलिबाग । जमिनीच्या सातबार्‍यावर नाव लावण्यासाठी 50 हजारांची लाच घेणार्‍या विळे सजाच्या तलाठ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी निजामपूरच्या मंडळ अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
माणगाव तालुक्यातील नारायणगाव (साजे) परिसरात 49 वर्षीय तक्रारदार यांनी 2019 साली भागीदारीत 4 एकर 15 गुंठे जागा खरेदी केली होती. या जागेच्या सातबाऱ्यावर तक्रारदार आणि त्यांच्या भागीदारांचे नाव लावण्यासाठी निजामपूरचे मंडळ अधिकारी साहेबराव साबळे (वय 57) आणि विळेचे तलाठी सचिन मिसाळ यांनी 50 हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
 
तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दाखवत याबाबतची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि त्यांच्या टीमने बुधवारी (9 जून) सापळा लावला होता. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सचिन मिसाळ याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
 
दरम्यान, नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार जाधव, पवार, पोलीस नाईक ताहमहणेकर, पांचाळ, पवार, महिला पोलीस नाईक विश्वासराव, पोलीस शिपाई चव्हाण, माने, चालक पोलीस हवालदार गायकवाड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.