पहिल्याच पावसात पेण दुय्यम निबंधक कार्यालयात साचले गुडघाभर पाणी!

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
Pen Registrar Office_Raig
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणार्‍या पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला पहिल्याच पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या कार्यालयात गुडघाभर पाणी साचले. यामुळे या कार्यालयाचे कामकाज काही काळाकरिता ठप्प झाले होते.
 
पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे निबंधक अधिकारी संजय घोडजकर यांनी तातडीने भर पावसात उभे राहून कार्यालयावर स्वखर्चाने प्लास्टिक टाकून तात्पुरती डागडुजी करुन घेतली आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज पुन्हा सुरु होऊ शकले.
यासंदर्भात दुय्यम निबंधक अधिकारी संजय घोडजकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून कार्यालयाकरिता नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार केली आहे. त्याकरिता निधीसुद्धा उपलब्ध आहे. कार्यालयालासाठी जागा हस्तांतरित करावी, अशी मागणीही केली आहे.
 
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गळक्या कार्यालयाच्या दुरुस्तीकरिता वारंवार लेखी पत्रे देऊनही त्यांनी याची दखल घेतली नाही. याउपर सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी घ्यावी, अशी लेखी सूचना केल्याची माहिती घोडजकर यांनी दिली. तसेच मागील 3 वर्षांपासून आपण स्वखर्चाने या कार्यालयाची डागडुजी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, पेण दुय्यम निबंधक कार्यालयाची इमारत जुनी असल्याने आता त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना होण्याची भितीही नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.