अलिबाग : मांडवखार येथील 95 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

By Raigad Times    10-Jun-2021
Total Views |
 fight against corona_alib
 
अलिबाग । कोरोनाचा धसका अख्ख्या जगाने घेतला आहे. मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती असेेल तर कोरोनावर आपण यशस्वीरित्या मात करु शकतो, हे मांडवखार येथील एका 95 वर्षीय आजोबांनी दाखवून दिले आहे. 
 
नथुराम महादेव मोकल असे या 95 वर्षीय आजोबांचे नाव आहे. ते अलिबाग तालुक्याच्या खारेपाट विभागातील मांडवखार येथील प्रसिद्ध बागायतदार व कुशल शेतकरी आहेत. त्यांना ताप खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे 23 मे रोजी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
कोरोनासारखी लक्षणे असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आली होती. नथुराम मोकल यांना खूप त्रासही होऊ लागला होता; परंतु प्रचंड इच्छाशक्ती व अलिबाग शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनी या 95 वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
 
कोरोनाला न घाबरता वेळेवर उपचार घेतल्यास व डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो, अशी प्रतिक्रीया बरे झाल्यानंतर नथुराम मोकल यांनी दिली. सर्व कर्मचारी व मुलगे आनंद मोकल व धनंजय मोकल यांच्या प्रयत्नांमुळेच मी कोरोनावर मात करु शकलो, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, कोरोना मुक्त झालेल्या नथुराम मोकल आजोबांना सरकारी रुग्णालयातील नर्स व कर्मचारी यांनी घरी पाठवले.