कोकणात पुढचे तीन दिवस मेघगर्जना, विजांसह पाऊस!

By Raigad Times    01-Jun-2021
Total Views |
weather alert_konkan_advi
 
  • पुणे कृषि हवामान विभागाचा इशारा
  • रायगडसह कोकणातील शेतकर्‍यांसाठी ‘हा’ कृषी सल्ला
अलिबाग । कोकणात पुढचे तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे कृषि हवामान विभागाने वर्तविली आहे. आज (1 जून) कृषि हवामान विभागाकडून 1 ते 5 जून या कालावधीकरिता हवामान इशारा देण्यात आला असून, राज्यासाठीचे सविस्तर कृषी हवामान सूचना पत्रकही जारी केले आहे.
 
त्यानुसार, 2 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
3 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यावेळी वार्‍याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असण्याची शक्यता आहे.
 
4 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे कृषि विभागाने वर्तविली आहे.
-------------------------------------- 
कोकण विभागासाठी कृषी सल्ला...
--------------------------------------
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर येथील प्रादेशिक कृषी हवामान केंद्राने शेतकर्‍यांना दिलेला कृषी सल्ला खालीलप्रमाणे :-
  • सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात खरीप भात रोपवाटीका पेरणीची कामे हाती घ्यावीत.
  • रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात खरीप भात रोपवाटीका तयार करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी.
  • नाचणी पिक पेरणीसाठी शेतीची नांगरट करणे, कुळवणी करणे, शेतातील धसकटे वेचणी करणे इ. पूर्व मशागतीची कामे पूर्ण करुन घ्यावी. घाट लगतच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने पेरणी केलेल्या भात रोपवाटीकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
  • फळबागांत, भाजीपाला पिकांत अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
  • काजू, सुपारी व नारळ बागांतील नवीन लागवड केलेली रोपे वार्‍यामुळे कोलमडू नयेत, यासाठी रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
  • भाजीपाला पिकांमध्ये मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, काकडी, कारली, पडवळ, चिबूड, शिराळी इ. पिकांची पेरणी करावी.

weather alert_konkan_advi