सुधागडातील कवेळे गावाजवळील घटना
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील कवेळे गावाजवळील घाट वळणावर बोअरवेल ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, 4 जण जखमी झाले आहेत.
सोमवारी (31 मे) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोअरवेल ट्रकचालक छोटू मुन्नालाल यादव (वय 28, रा.मध्यप्रदेश) हा महागाव येथून बोअरवेल ट्रक घेऊन कवेळे उद्धरमार्गे वाकणकडे वेगाने चालला होता. कवेळे येथे घाट उतारावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला.
यामध्ये ट्रकमधील कामगार प्रेमसुखदास पन्हरिया (वय 40, मूळ राहणार मध्यप्रदेश) याच्या अंगावर ट्रकमधील ड्रिलिंग रॉड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रकमधील विकास रघुवंशी यास गंभीर दुखापत झाली असून ललित वरकडे, ट्रक चालक छोटू यादव व जयदीपकुमार रघुवंशी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात आज करण्यात आली असून, ट्रकचालक छोटू यादव याला अपघाताला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम. डी. बहाडकर करत आहेत.