रोहा : सर्पमित्र प्रणय जाधव याने दोन कोब्रा सापांना दिले जीवदान

By Raigad Times    01-Jun-2021
Total Views |
Save Snake_Snake Friend_N
                                                                                                                                                         छाया : नंदकुमार मरवडे
 
खांब-रोहे । रोहा तालुक्यातील रोठ खु. वाघेश्वर नगर येथील सर्पमित्र प्रणय जाधव याने अत्यंत विषारी समजल्या जाणार्‍या दोन कोब्रा जातीच्या सापांना सुरक्षितरित्या पकडून त्यांना जीवदान दिले आहे.
 
रोठ खु. वाघेश्वर नगर येथील भरत मालुसरे यांचे रोहे-कोलाड मार्गावर साई ऑटो गॅरेज आहे. येथे दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळेस मेकॅनिक जगदीश तुपकर यांना कोब्रा साप दृष्टीस पडला. त्यांनी लगेचच सर्पमित्र प्रणय जाधव याच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
 
प्रणय जाधव यानेही तात्काळ गॅरेजजवळ कोब्रा सापाला मोठ्या शिताफीने पकडून जीवदान दिले. तर दुसर्‍या घटनेत प्रणय जाधव याने मुठवली खु. येथील केतन ठमके यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या कोब्रा सापास जीवदान दिले.
 
सर्पमित्र प्रणय जाधव याने दोन्ही ठिकाणी दोन्ही विषारी कोब्रा जातीच्या सापांना मोठ्या शिताफीने पकडून दूरवर जंगल भागात सुरक्षितरित्या सोडले आहे. त्याने आतापर्यंत शेकडो विविध जातीच्या विषारी व बिनविषारी सापांना पकडून जीवदान दिले आहे.
साप कोणताही असो, दिसताच क्षणी त्याला मारु नका. तर माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन सर्पमित्र प्रणय जाधव सगळीकडे करीत असतो.
 
साप हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांना न मारता त्यांनाही जगू दिले पाहिजे.अशाप्रकारचे प्रबोधन करुन समाजात सापांबद्दल असणारे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न तो नेहमी करीत असतो.