खवले मांजराची तस्करी करणार्‍या चौघांना अटक

By Raigad Times    07-May-2021
Total Views |
Indian Pangolin Smuggling
 
सुधागड वन विभागाची कारवाई; दोन मोटारसायकली जप्त
 
पाली-बेणसे । खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या चौघांना सुधागड वन विभागाने गजाआड केले. गुरुवारी (6 मे) ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहेत.
 
सुधागड वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व सहायक वनरक्षक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे व कर्मचारी यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
 
नाडसूर ते जांभूळपाडा मार्गावर दोन संशयित मोटारसायकल थांबवून मोटारसायलस्वारांची चौकशी केली असता, अनिल भागू वाघमारे याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये झाकून ठेवलेले खवल्या मांजर आढळून आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूचि 1 मधील वन्यजीव असलेले खवले मांजर व त्याचे पिल्लू असे दोन खवले मांजर वन विभागाने जप्त केले.

Indian Pangolin Smuggling 
 
याप्रकरणी दशरथ लक्ष्मण वालेकर (रा.झाप आदिवासी वाडी), हिरामण बेंडु हिलम (रा. कुंभारशेत), अनिल भागू वाघमारे (रा. चावसर पुणे), रमेश अंकुश जाधव (रा.वांद्रे, ता.मुळशी) या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन्ही मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.