ऑनलाईन लसीकरण नोंदणीची वेळ निश्चित करा

07 May 2021 19:08:35
Prashant Naik_Alibag_1&nb
 
  • अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची मागणी
  • जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र
अलिबाग । अलिबागसह जिल्हाभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. मात्र ऑनलाईन लसीकरण नोंदणीची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची एकच वेळ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आज (7 मे) जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
 
अलिबाग शहरामध्ये 18 ते 44 या वयोगटासाठीचे लसीकरण सुरु आहे. याकरिता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. मात्र नोंदणीची लिंक सुरु होण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गांभीर्याने दखल घेत अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले आहे.
 
ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता एकच वेळ निश्चित करावी व ती वेळ सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. लसीकरण नोंदणीकरिता लिंक सुरु करण्याची एकच वेळ निश्चित केल्यास नागरिकांना सोयीचे होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
 
तसेच 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्याची मागणीही नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केली आहे. दुसर्‍या डोसची वेळ निघून गेल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, याकडे त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे सदरचे लसीकरण तातडीने सुरु करावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0