माणगाव : अबडूंगी येथे गुरांच्या वाड्याला आग; 3 म्हशींचा होरपळून मृत्यू

06 May 2021 20:45:26
Fire Accident_1 &nbs
 
3 म्हशी जखमी; शेतकर्‍याचे 4 लाखांचे नुकसान
 
माणगाव । तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील अबडूंगी गावालगत असणार्‍या गुरांच्या वाड्याला दुपारी अचानक आग लागली. या आगीत वाड्यात बांधलेल्या 6 म्हशांपैकी 3 म्हशींचा होरपळून मृत्यू झाला. तर तीन म्हशी भाजल्याने जखमी झाल्या आहेत. निजामपूरपासून 2 किमी अंतरावर ही घटना घडली. या आगीत शेतकर्‍याचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे.
 
अबडूंगी गावालगत मनोहर सखाराम उतेकर यांचा गुरांचा वाडा (गोठा) असून, आज (6 मे) घटना घडली तेव्हा या वाड्यात 6 म्हशी बांधलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना खाण्यासाठी भाताचा पेंडाही मोठ्या प्रमाणात साठवलेला होता. दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास या वाड्यात असणार्‍या वीज वाहिनीला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. यात वाड्यातील भाताच्या पेंड्याने पेट घेतला. त्यामुळे आग पसरुन वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

Fire Accident_1 &nbs 
 
या घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तोपर्यंत खूप उशिर झाला होता. या दुर्घटनेत तीन म्हशींचा होरपळून मृत्यू झाला. तर तीन म्हशी गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्या आहेत. जखमी म्हशींवर तातडीने निजामपूर पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवगुंडे यांनी उपचार केले. तर वाड्याची कौले, वाशे, ढापे यांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
घटनेची माहिती मिळताच निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजा रणपिसे, माजी सरपंच बाळाराम दबडे, कोस्ते ग्रामपंचायतीचे सदस्य गोविंद कासार यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. नुकसानग्रस्त शेतकर्‍याला शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
दरम्यान, निजामपूरचे तलाठी आगे यांनी घटनेचा पंचनामा केला असून वाड्याचे नुकसान 90 हजार रुपये, मृत 3 म्हशींचे 2 लाख 40 हजार रुपये, जखमी म्हशींचे 60 हजार रुपये असे एकूण 3 लाख 90 रुपये नुकसान झाल्याचे शासनाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0